सुरेश वाणी
जुन्नर: जुन्नर तालुक्यात काँग्रेस पक्षाची संघटना सध्या मरगळलेल्या अवस्थेत असल्याची चर्चा असून, तालुक्यात वरिष्ठ नेतृत्वाने कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन संघटना मजबूत करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी पक्षातील कार्यकर्त्यांकडून होत आहे. तालुकाध्यक्षपदात झालेल्या बदलानंतर पक्षातील नाराजी अधिक तीव्र झाल्याचे बोलले जात आहे.
माजी तालुकाध्यक्ष अशोक घोलप यांच्याकडून पदाची जबाबदारी काढून अंबर परदेशी यांच्याकडे सोपविण्यात आली. हा निर्णय घेताना स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्यात आले नसल्याची भावना व्यक्त होत आहे. अंबर परदेशी हे पक्षात तुलनेने नव्याने सक्रिय झाले असताना त्यांच्याकडे थेट तालुकाध्यक्षपदाची धुरा सोपविल्याने दीर्घकाळ पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे सांगितले जाते.
विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे युवा नेते सत्यशील शेरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढविली होती. त्यावेळी अशोक घोलप यांनी त्यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करून पाठिंबा दिला होता; मात्र, शेरकर यांच्या राष्ट्रवादीतील अधिकृत पक्षप्रवेशाबाबत सार्वजनिक नोंद अथवा छायाचित्र समोर न आल्याने ते अद्याप काँग्रेसशी संबंधित असल्याचा दावा काही समर्थकांकडून केला जात आहे. तालुकाध्यक्षबदलाबाबत काही कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.
जुन्नर नगरपरिषद निवडणुकीत अशोक घोलप यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे तीन नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे त्यांना अचानक पदावरून बाजूला केल्याची चर्चा समर्थकांमध्ये आहे. दरम्यान, अपक्ष आमदार शरद सोनवणे यांना विधानसभा निवडणुकीत मदत करणारे सूरज वाजगे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेशाची इच्छा व्यक्त केल्याचे समजते. त्यांनी तालुकाध्यक्षपदाची अपेक्षाही व्यक्त केली होती; मात्र, नुकताच बदल झाल्याने प्रतीक्षा करण्याचा सल्ला जिल्हा नेतृत्वाने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काँग्रेस संघटनेसमोरील प्रमुख प्रश्न
तालुकाध्यक्ष बदलामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी.
स्थानिक नेतृत्वाला विश्वासात न घेतल्याची भावना.
गटबाजी वाढल्याची चर्चा.
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी संघटना बळकट करण्याची गरज.
वरिष्ठ नेतृत्वाने तातडीने जुन्नरमध्ये मेळावा घेण्याची कार्यकर्त्यांची मागणी.