

खडकवासला: घाटमाथ्यासह धरणक्षेत्रात सोमवारी सकाळपासून संततधार पाऊस सुरू असल्याने चार धरणांच्या खडकवासला प्रकल्पात पाण्याची आवक वाढली आहे. शंभर टक्के भरलेल्या पानशेत, वरसगाव व खडकवासला धरणांच्या विसर्गात सकाळपासून टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात आली. धरणसाखळीत सायंकाळी पाच वाजता २९.०१ टीएमसी म्हणजेच ९९.५४ टक्के पाणीसाठा झाला होता.
खडकवासला धरणातून मुठा नदीत २९ हजार ११७ क्सुसेक विसर्ग केला जात आहे. टेमघरची पातळी जवळपास शंभर टक्क्यांवर आली आहे. धरणसाखळी फुल्ल झाल्याने जादा पाणी नदीत सोडले जात आहे. धरणक्षेत्रासह नदीकाठच्या रहिवाशांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन खडकवासला जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी केले आहे.
घाटमाथ्यावरील पानशेत वरसगाव धरण खोऱ्यातील माणगाव, शिरकोली दापसरे तव टेकपोळे भागात पावसाचा जोर अधिक आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास जादा पाणी नदीत सोडण्यात येणार आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून धरणक्षेत्रात पावसाचा जोर ओसरला. घाटमाथ्यालगतच्या पानशेत-वरसगाव खोऱ्यात पावसाळी वातावरण कायम आहे.
टेमघर धरणात ९५.५० साठा झाला आहे. धरण उद्या भरून वाहू लागण्याची शक्यता आहे. संततधार पावसामुळे पाण्याची आवक वाढल्याने वरसगावच्या विसर्गात १० हजार ४४७, तर पानशेतच्या विसर्गात १० हजार १३४ क्सुसेकपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दोन्ही धरणांतून येणाऱ्या पाण्यामुळे खडकवासल्याच्या विसर्गात देखील वाढ करण्यात आली आहे.
टेमघर येथे सोमवारी दिवसभरात ५५ , वरसगाव येथे ३६, पानशेत येथे ३७ व खडकवासला येथे १० मिलीमीटर पाऊस पडला. गतवर्षी ३ ऑगस्ट रोजी धरणसाखळीत २५.७६ टीएमसी म्हणजे ८८.३८ टक्के पाणीसाठा झाला होता. यंदा २९.०१ टीएमसी म्हणजे ९९.५४ टक्के साठा झाला आहे.