Onion Farmers  Pudhari
पुणे

Junnar Onion Farmers Weather Impact: जुन्नर तालुक्यात ढगाळ हवामानाचा कांदा उत्पादकांना फटका

कीड प्रादुर्भाव वाढला, औषधफवारणीचा खर्च वाढल्याने शेतकरी चिंतेत

पुढारी वृत्तसेवा

नारायणगाव: जुन्नर तालुक्यामध्ये दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंता व्यक्त करीत असून, औषधफवारणीचा खर्च अधिकचा वाढणार आहे. इतर तरकारी पिकांवर देखील या हवामानाचा विपरीत परिणाम होत आहे. यंदा जुन्नरमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड झालेली आहे. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत येऊ लागले आहेत.

ओतूर, डिंगोरे, उदापूर, शिरोली बुद्रुक, शिरोली खुर्द, तेजेवाडी, धालेवाडी, सावरगाव, वडज, धामणखेल, खामुंडी आदी भागांमध्ये हजारो एकर कांद्याची लागवड झालेली आहे. कांद्याच्या बाजारभावाची हमी नसताना देखील शेतकरी आज नाही, तर उद्या कांद्याचे पैसे होतील, या आशेने कांदा लागवड करीत आहेत. परंतु, सध्या निसर्गाचा लहरीपणा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे.

सध्या कांदा पिकावर मावा तुडतुडे, पांढरी माशी यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. लागवडीचा खर्च तसेच खते व औषधे यांचा खर्च मोठ्या प्रमाणात केला आहे. आता त्यात भर म्हणजे औषधफवारणीचा खर्च अधिकचा वाढणार आहे.

त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. कांदळी वडगाव येथील शेतकरी रामदास पवार म्हणाले की, गेल्या पाच-सहा वर्षांपासून कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नाही. तथापि, शेतकरी कांदा लागवड अधिक प्रमाणात करीत आहेत.

आज किंवा उद्या बाजारभाव मिळेल, या आशेने शेतकरी कांदा लागवडीकडे वळत आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य प्रकारे न्याय द्यावा. दरम्यान, या ढगाळ हवामानाचा फटका आंब्याच्या मोहराला देखील बसत आहे. आंब्याचा मोहर अधिक प्रमाणात गळून जात असून, याचा आंबा उत्पादनावर परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यांत चिंता पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT