Dahihandi Child Safety Pudhari
पुणे

Junnar Child Kidnapping Rumour: जुन्नरमध्ये बालक पळविणारी टोळी? पोलिसांच्या तपासात अफवा ठरली खोटी

४० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले; उपचार सुरू असलेली महिला नातेवाईकांसोबत असल्याचे स्पष्ट

पुढारी वृत्तसेवा

ओतूर: नेतवड (ता. जुन्नर) येथे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान दीड वर्षांच्या बालकाला अनोळखी महिला घेऊन जात असल्याचा गैरसमज झाल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेनंतर ‘लहान मुले पळविणारी टोळी आली’ अशी अफवा समाजमाध्यमांवर वेगाने पसरली; मात्र, ओतूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत ४० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत महिलेचा शोध घेतला. पोलिसांच्या तपासात बालक पळविणारी कोणतीही टोळी अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले असून, सोशल मीडियावरील अफवा पूर्णपणे खोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

नेतवड येथे रविवारी (दि. ६) सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास दहीहंडीचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी गर्दीमध्ये दीड वर्षांचे बालक खेळत होते. त्यावेळी एक अनोळखी महिला बालकाला घेऊन जात असल्याचे बालकाच्या आजीच्या लक्षात आले. आजीने तत्काळ बालकाला आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर संबंधित महिला लाल रंगाच्या स्विफ्ट कारमधून जुन्नरच्या दिशेने निघून गेली.

घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने दोन पोलीस पथके तयार केली. पोलिसांनी ओतूर, जुन्नर तसेच परिसरातील ४० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तपासादरम्यान संबंधित महिला ज्या लाल रंगाच्या स्विफ्ट कारमधून गेली होती, त्या वाहनाचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले.

सदर वाहन जुन्नर येथे आढळून आल्यानंतर पोलिसांनी महिलेबाबत अधिक माहिती घेतली. संबंधित महिलेचे नाव आरीफा मुराद व्यापारी (वय ५२, रा. जुन्नर) असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तिच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता, तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली, तसेच ती घरातून कोणालाही काहीही न सांगता बाहेर पडली असल्याचेही स्पष्ट झाले.

दरम्यान, रविवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास ती नेतवड येथे गेली होती. त्यानंतर तिचे नातेवाईक तिला नेतवड येथे घेऊन आले आणि लाल रंगाच्या स्विफ्ट कारमधून पुन्हा जुन्नर येथे घेऊन गेले. त्यामुळे बालकाच्या अपहरणाचा अथवा बालकांना पळविणाऱ्या टोळीचा कोणताही संबंध नसल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले.

अफवांवर विश्वास ठेवू नका

घटनेनंतर समाजमाध्यमांवर बालकांना पळविणारी टोळी परिसरात सक्रिय असल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र, पोलिसांनी तातडीने तपास करून या अफवांना पूर्णविराम दिला आहे. नागरिकांनी सोशल मीडियावरील अपुऱ्या किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये तसेच अफवा पसरवू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. लहान मुलांना घरात, वाहनात किंवा सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत एकटे सोडू नये. पालकांनी शक्य असल्यास घर व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर बाजगीरे यांनी केले आहे.

तत्पर तपासाबद्दल पोलिसांचे कौतुक

ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, जुन्नर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील तसेच ओतूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, संदिप आमणे, पोलीस हवालदार नरेंद्र गोराणे, दिनेश साबळे, तसेच पोलीस कर्मचारी ज्योतीराम पवार, अमोल शिंदे, राजेंद्र आमले, आशिष जगताप आणि महिला पोलीस कर्मचारी आकांक्षा साबळे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT