Jitendra Ganeshotsav Pudhari
पुणे

Pune Traffic Jitendra: पुण्याच्या ट्रॅफिकवर जितेंद्र नाराज; ‘दीड तास अडकलो, कार्यकर्त्यांनी मदत केली’

गणेशोत्सवातील डीजे-डॉल्बीच्या वादावरही भाष्य; ‘बाप्पाच्या आवाजावरून निरर्थक वाद नको’

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गेल्या १५ वर्षांपासून मी पुण्यात गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी नियमित येत आहे. मात्र, अलिकडच्या काळात पुण्यातील वाहतूक कोंडी प्रचंड वाढली आहे. यंदा तर मला तब्बल दीड तास ट्रॅफिकमध्ये अडकून राहावे लागले. सुदैवाने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वेळेत मदत केली; अन्यथा रात्री ११ वाजेपर्यंत रस्त्यावरच अडकून पडलो असतो, अशा शब्दांत बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी पुण्यातील बिघडलेल्या वाहतूकव्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

पुण्यातील छत्रपती राजाराम मित्रमंडळाच्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी अभिनेते जितेंद्र सोमवारी (दि. २१) सायंकाळी आले होते. या वेळी उपस्थित माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी पुण्यातील वाढत्या ट्रॅफिकचा चांगलाच समाचार घेतला. आपल्या भावना व्यक्त करताना जितेंद्र म्हणाले की, मी आता ८५ वर्षांचा झालो आहे. वाढत्या वयासोबत अडचणी येत असल्या, तरी जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत या मंडळाच्या बाप्पाच्या दर्शनासाठी मी पुण्यात येतच राहणार आहे.

‘गणेशोत्सवातील आवाज हा बाप्पाचा, वाद निर्माण करू नका’

सध्या गणेशोत्सवात चर्चेत असलेल्या डीजे आणि डॉल्बीच्या आवाजाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, डीजे-डॉल्बीच्या आवाजावरून सध्या उगाच वाद-विवाद सुरू आहे. अशा प्रकारे वाद निर्माण करणे पूर्णपणे चुकीचे आहे. गणेशोत्सवातील आवाज हा बाप्पाचा आवाज असतो आणि तो मनाला शांतता देणारा असतो. त्यामुळे सणासुदीच्या काळात निरर्थक वाद उकरून काढून वातावरणातील शांतता भंग करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

बालपणीच्या चाळीतील आठवणींना उजाळा

आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना जितेंद्र भावुक झाले. लहानपणी मी चाळीत राहत होतो. त्या वेळी चाळीतील प्रत्येक घरात गणपती विराजमान व्हायचे आणि संपूर्ण कुटुंबात एकोपा असायचा. सगळे एकमेकांना ओळखत असत. पण, आजच्या काळात मी खूप मोठा ॲक्टर झालो, आता म्हाताराही झालो; मात्र शेजारी कोण राहते? हे मलाही ठाऊक नसते.

आजच्या काळात शेजारी कोण राहतेय? याची कल्पना कोणालाच नसणे, ही शोकांतिका आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. लहानपणी गणेशोत्सवाचा आनंद आणि आकर्षण काही वेगळेच होते. बाप्पाच्या कृपेने मला आयुष्यात सर्व काही मिळाले आहे, तरीही पूर्वीसारखी मनाला शांतता मिळत नाही, अशी मनमोकळी कबुलीही त्यांनी या प्रसंगी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT