Jejuri Khandoba Temple Pudhari
पुणे

Jejuri Somvati Yatra: जेजुरीत दीड वर्षानंतर सोमवती यात्रा; १५ जूनला रंगणार खंडोबा पालखी सोहळा

पहाटे कऱ्हा नदीवर खंडोबा-म्हाळसा देवींचा धार्मिक स्नान सोहळा; भाविकांसाठी व्यापक तयारी

पुढारी वृत्तसेवा

जेजुरी: महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाचा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असणारा सोमवती यात्रा पालखी सोहळा दीड वर्षानंतर सोमवारी (दि. १५) होत आहे. यानिमित्त जेजुरी गडावरून श्री खंडोबा देवाचा पालखी सोहळा मध्यरात्री दोन वाजता कऱ्हा नदीकडे मार्गस्थ होणार आहे. पहाटे सहा वाजता देव अंघोळीचा धार्मिक सोहळा पार पडेल. याबाबत देवाचे इनामदार व मानकरी राजेंद्र पेशवे यांनी बैठकीत माहिती दिली.

दरवर्षी सोमवार अमावास्येला सोमवती यात्रा भरते. वर्षातून दोन वेळा ही यात्रा येते. मात्र, मागील वर्षी तिथींचा क्षय झाल्याने दीड वर्षाने सोमवती यात्रा भरत आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी श्री खंडोबा पालखी सोहळा खांदेकरी मानकरी व ग्रामस्थाच्या बैठक मंगळवारी (दि. ९) पार पडली. रविवारी (दि. १४) दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी अमावस्या सुरू होत आहे. तर सोमवारी (दि. १५) सकाळी ८ वाजून ३४ मिनिटांपर्यंत अमावस्या आहे.

सोमवारी पहाटे २ वाजता कऱ्हा स्नानासाठी जेजुरी गडावरून खंडोबा देवाचा पालखी सोहळ्याचे प्रस्थान होईल. पहाटे सहा वाजेच्या दरम्यान खंडोबा व म्हाळसा देवीच्या उत्सव मूर्तींना कऱ्हा नदीवर अंघोळ घालण्यात येईल. सकाळी ९ वाजता पालखी सोहळा गडावर पोहचून पाकळणी करण्यात येईल, असे या बैठकीत राजेंद्र पेशवे यांनी सांगितले.

या वेळी श्री खंडोबा पालखी सोहळा खांदेकरी मानकरी, ग्रामस्थ समितीचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, राजेंद्र पेशवे, रोहिदास माळवदकर, संतोष खोमणे पाटील, कृष्णा कुदळे, छबन कुदळे, सुधीर गोडसे, सुशील राऊत, पुंडलिक दावलकर, अनिल झगडे, नागनाथ झगडे, शैलेश राऊत, राजेंद्र चौधरी, प्रसाद अत्रे, राजाभाऊ खाडे, 8पान २ वर

सोमनाथ उबाळे, वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी, उमेश जगताप, श्री मार्तंड देवसंस्थानचे अध्यक्ष विश्वास पानसे, पोपट खोमणे, मंगेश घोणे, जेजुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले, पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.

ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, सचिव छबन कुदळे यांच्यासह इतरांनी सोमवती यात्रेनिमित्त विविध सूचना केल्या आहेत. तर जेजुरी देवसंस्थानच्या वतीने ठिकठिकाणी मंडप, वीज, पाणी नाष्टा, शहरातील सर्व मंदिरा विद्युत रोषणाई, इतर व्यवस्था करण्यात येणार असल्याचे देवसंस्थांचे अध्यक्ष विश्वास पानसे यांनी सांगितले.

जेजुरी नगरपरिषदेच्या वतीने पालखी सोहळा मार्गाची पाहणी करण्यात आली आहे. रस्त्याची डागडुजी, पिण्याचे पाणी, पालखी मार्गावर लाइट, फिरते शौचालय आदी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी सांगितले. तसेच, पालखी सोहळ्यात भाविकांची सुरक्षितता, कायदा आणि सुव्यवस्था, वाहतुकीचे नियंत्रण यासाठी जादा पोलिस दल तैनात करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी सांगितले.

भेसळयुक्‍त भंडारा विकणार्‍यांवर कारवाई

यात्रेनिमित्त जेजुरीत अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने भंडाऱ्याची तपासणी करण्यात येणार आहे. भेसळयुक्त भंडारा विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे दुकानदारांनी शुद्ध भंडारा विक्रीसाठी ठेवावा. कऱ्हा नदीवर धार्मिक विधीसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT