

नारायणगाव: मृग नक्षत्र सुरू झाले असले तरी पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. यंदाचा उन्हाळा अत्यंत कडक असल्याने धरणांतील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे कुकडी प्रकल्पातील साठ्यात झपाट्याने घट होत आहे. सध्या प्रकल्पात अवघा 6.99 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच दिवशी कुकडी प्रकल्पात दहा टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. पावसाचे आगमन लांबण्याची शक्यता असल्याने कुकडी प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखून ठेवावे, अशी मागणी होत आहे.
कुकडी प्रकल्पातून पारनेर, श्रीगोंदा, कर्जत आणि करमाळा या तालुक्यांसाठी उन्हाळी आवर्तन सुरू आहे. हे आवर्तन सुमारे वीस दिवस चालणार आहे. दररोज सुमारे १४०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. एकीकडे धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असताना दुसरीकडे सुरू असलेल्या आवर्तनामुळे उपलब्ध पाण्यावर अतिरिक्त ताण येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणात सुमारे १७.९९ टक्के, माणिकडोह धरणात अवघा ५.११ टक्के, वडज धरणातील उपयुक्त पाणीसाठा ३०.६८ इतका आहे. पिंपळगाव जोगे धरणात १६.५६ टक्के पाणीसाठा असून, डिंभे धरणात केवळ ६.६३ टक्के पाणी शिल्लक आहे. त्यामुळे आगामी काळात पाण्याचे नियोजन अधिक काळजीपूर्वक करण्याची गरज आहे.
दरम्यान, मान्सून वेळेत दाखल झाला नाही, तर शेतीबरोबरच ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः जुन्नर, आंबेगाव आणि परिसरातील गावांमध्ये पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर कुकडी प्रकल्पातून पूर्व भागासाठी सुरू असलेले उन्हाळी आवर्तन तातडीने बंद करावे, अशी मागणी विविध शेतकरी संघटनांनी केली आहे.
उपलब्ध पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवण्याची आवश्यकता असल्याचे मत शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. वाढलेले तापमान, घटणारा पाणीसाठा आणि सुरू असलेला पाण्याचा विसर्ग, यामुळे कुकडी प्रकल्पाच्या जलव्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.