नितीन राऊत
जेजुरी : नगरपरिषदेची निवडणूक म्हणजे बहुरंगी, बहुढंगी. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना (उबाठा) चे उमेदवार येथे रिंगणात होते. राज्यामध्ये महायुती असणारे पक्ष येथे एकमेकांविरोधात लढले. धनलक्ष्मीचा मुक्त वापर झाल्याने मोठ्या संख्येने मतदार जोमात तर उमेदवारांना कोमात जाण्याची वेळ आली. अर्थपूर्ण झालेल्या या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला आपणच विजयी होणार असा आत्मविश्वास आहे; मात्र खात्री नसल्याने धाकधूक वाढली आहे. त्यातच मतमोजणी लांबणीवर पडल्याने अधिकच धाकधूक पाहण्यास मिळत आहे.
मागील काळात काँग्रेसची सत्ता नगरपरिषदेवर होती. माजी आमदार संजय जगताप यांच्या भाजपा प्रवेशामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते देखील भाजपामध्ये आले आणि राजकीय समीकरण बदलले. या निवडणुकीत भाजपने प्रथम स्वबळाचा नारा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्रित आले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होणार, असे चित्र असतानाच जागा वाटपावरून आघाडीची बिघाडी झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसने घड्याळाच्या चिन्हावर स्वबळावर निवडणूक लढण्याचे जाहीर केले. शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनीही वेगळी चूल मांडली. राज्यात असणारी महायुती येथील निवडणुकीत एकमेकांविरोधात उभी राहिली.
भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 10 प्रभागात 20 उमेदवार आणि नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिले. भाजपाला काही प्रभागात सक्षम उमेदवार मिळाला नाही. शिवसेना पक्षाला अनेक ठिकाणी उमेदवार मिळाले नाहीत. त्यामुळे नगराध्यक्ष व इतर केवळ तीन उमेदवार नगरसेवकपदासाठी रिंगणात उतरले. शिवसेना (उबाठा) पक्षाचे दोन तर काँग्रेसचा केवळ एकच उमेदवार येथे आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा व राष्ट्रवादीचे उमेदवार प्रबळ होते; मात्र शिवसेनेकडून दिनेश सोनवणे यांनी प्रचारात आघाडी घेऊन दोन्ही उमेदवारांसमोर कडवे आव्हान निर्माण केले.
जेजुरी नगरपरिषद निवडणुकीत मतदारांची संख्या 15 हजार 800 होती. यातील 12 हजार 333 मतदान झाले. यात 6 हजार 436 महिला तर 5 हजार 895 पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. मतदानात महिलाच पुढे होत्या. एकूण 78.06 टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीत 86 टक्के मतदान होऊन सत्ता परिवर्तन झाले होते. या निवडणुकीत मागील निवडणुकीपेक्षा 8 टक्के मतदान कमी झाले. हे कमी मतदान कोणाला अडचणीत आणणार हे 21 तारखेला स्पष्ट होईल.
पैशांच्या जोरावर निवडणुका बंद व्हाव्यात
जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुका नेहमीच अर्थपूर्ण होतात. अनेक मतदार पैशांच्या आमिषाला बळी पडतात. पैसे देऊनही आपल्यालाच मतदान करतील याचीही खात्री नसते. लोकशाहीला घातक असणारी प्रथा रूढ झाल्याने धनशक्तीच्या जोरावर निवडणुकीचे पेव वाढत आहे. या निवडणुकीत पैसे वाटपाचा धुरळा झाला. अनेक मतदार जोमात तर उमेदवार कोमात जाण्याची वेळ आली. पैशांच्या जोरावर निवडणुका बंद झाल्या पाहिजेत असे मत अनेक सुज्ञ मतदारांनी व्यक्त केले.
‘त्या’ मतदारांची नावे रद्द होणे गरजेचे
जेजुरीत बाहेरगावातून कामानिमित्त आलेल्या आणि 10 ते 15 वर्षांपासून येथे वास्तव्य नसलेल्या मतदारांची संख्या मोठी आहे. केवळ मतदानादिवशी येऊन अर्थकारण करणाऱ्या या मतदारांची नावे यादीतून रद्द होणे आवश्यक असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.