

लोणावळा : एका व्यावसायिकाच्या वाहनचालकास पैशांच्या देवाण-घेवाणीवरून आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने कोयता, दांडक्याने मारहाण केली. या वेळी हाणामारीतून जीव वाचण्यासाठी संबंधित व्यक्तीने केलेल्या गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत.
ही घटना बुधवार(दि. 3) रात्री साडेनऊच्या सुमारास कामशेत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुंढावरे गावजवळील इंद्रायणी ढाब्याजवळ घडली. याप्रकरणी कामशेत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून, इतर पाच ते सहाजण फरार आहेत. रोहित मदन कुर्मा (25, रा. रामनगर, पिंपरी) असे गोळीबारात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. फिर्यादी आरोपी अशोककुमार मुनेष्वर सिंग (60, रा. तापकीरमळ चौक, काळेवाडी, पिंपरी, मूळ रा. आजमगढ, उत्तर प्रदेश) व आकाश ऊर्फ बंटी भवरसिंग राजपूत (23, रा. रामनगर, देहूरोड) अशी आरोपींची नावे असून, इतर सहा ते सात जणांची ओळख पटली नाही.
कामशेत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आरोपी अशोककुमार मुनेष्वर सिंग हा वाहनचालक असून, त्याचा मालक हरीश सिंग हा आहे. हरीश सिंग आणि आरोपी आकाश ऊर्फ बंटी भवरसिंग राजपूत यांच्यात व्यवसायातील पैशांवरून वाद होता. या वादातून आकाश राजपूत आणि त्याच्या आठ ते नऊ साथीदारांनी फिर्यादी अशोककुमार मुनेष्वर सिंग याला मुंढावरे गावच्या हद्दीतील इंद्रायणी ढाबा येथे गाठून शिवीगाळ केली; तसेच त्याला आणि त्याचा मालक हरीश सिंग याला जीवे मारण्याची धमकी दिली; तसेच तुम्ही आमच्या व्यवहाराचे पैसे दिले नाहीत, तुम्हाला संपवूनच टाकतो, असे म्हणत अशोककुमारच्या कारवर कोयते, दांडक्यांनी हल्ला करून नुकसान केले व गाडीतून खाली ओढून त्याच्यावर हत्यारांनी हल्ला केला.
या वेळी अशोककुमारने या हल्ल्यातून वाचण्यासाठी स्वसंरक्षणार्थ टोळक्याच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात रोहित कुर्माच्या डोक्याला गोळी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर, अशोककुमार मुनेष्वर सिंग आणि इतर दोघेजण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोणपे, कामशेत पोलिस निरीक्षक शंकर पाटील, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्यासह कामशेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी अशोककुमार मुनेश्वर सिंग याच्यासह इतरांना दोघांना ताब्यात घेतले. तसेच, या घटनेत जखमी झालेल्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दोन्ही बाजूकडून एकमेंकाविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली. तसेच, या प्रकरणातील इतर फरारी आरोपींचा पोलिस शोध घेत आहे.
आरोपी आकाश उर्फ बंटी भवरसिंग राजपूत आणि रोहित मदन कुर्मा हे दोघे सराईत गुन्हेगार आहेत. आकाश ऊर्फ बंटी भवरसिंग राजपूतच्या विरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. तर, मयत आरोपी रोहित कुर्मा याच्या विरोधात पिंपरी, निगडी व मंचर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक शंकर पाटील हे करीत आहेत.