

पिंपरी : श्री मयुरेश्वर अवतार श्रीमंत महासाधू श्री मोरया गोसावी महाराजांच्या 464 व्या संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन 6 ते 10 डिसेंबरदरम्यान चिंचवड येथील संजीवन समाधी मंदिर आणि श्री मंगलमूर्ती वाडा येथे करण्यात येणार आहे.
यंदाच्या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे ‘इथेनॉल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉ. प्रमोद चौधरी यांना ‘श्री मोरया गोसावी महाराज जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असून, प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, योगिता गोडबोले, संदीप उबाळे आणि पं. भुवनेश कुमार कोमकली यांच्या गायनाची पर्वणी रसिकांना अनुभवता येणार आहे. याचबरोबर संकर्षण कऱ्हाडे आणि स्पृहा जोशी यांच्या विशेष कार्यक्रमांसह योगेश सोमण यांचा ‘आनंदडोह’ हा सांस्कृतिक कार्यक्रमही यंदाच्या सोहळ्याचे आकर्षण ठरणार आहे.
शनिवार (दि. 6) सायंकाळी साडेपाच वाजता या सोहळ्याचे उद्घाटन मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, तसेच सहधर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर उपस्थित राहणार आहेत. खासदार श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, उमा खापरे, अमित गोरखे आणि बापूसाहेब पठारे; तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहूचे मुख्य विश्वस्त जालिंदर महाराज मोरे आदी मान्यवरही सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी विश्वस्त जितेंद्र देव, केशव विद्वांस आणि ॲड. देवराज डहाळे तसेच माजी महापौर अपर्णा डोके, माजी नगरसेवक सुरेश भोईर, मोरेश्वर शेडगे, अश्विनी चिंचवडे आदी उपस्थित होते.
यंदाच्या महिन्यापासून दर संकष्टी चतुर्थीस पवनामाई आरती सोहळा सुरू केला जाणार आहे. पर्यावरण व नदीविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे.
उद्घाटनापूर्वी नितीन दैठणकर यांचे सनईवादन होणार आहे. सोहळ्यात पाचही दिवस सकाळी सहा वाजता सनई चौघडा वादन; तसेच सकाळी साडेआठ वाजता श्री मोरया गोसावी महाराज ओवीबद्ध चरित्र पठण होणार आहे. सोहळ्यातील धार्मिक विधींमध्ये रविवार (दि. 7) सकाळी सात वाजता सामुदायिक अथर्वशीर्ष पठण, सकाळी नऊ ते अकरादरम्यान सामुदायिक महाभिषेक आणि मन्युसुक्त हवन यांचा समावेश आहे.
सोहळ्यादरम्यान धार्मिक कार्यक्रमांसोबतच 7 आणि 8 डिसेंबर रोजी आरोग्य, दंत व नेत्र तपासणी शिबिरे, तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे; तसेच बुधवार (दि. 9) सकाळी ‘सोहम योग साधना मंडळा’ तर्फे योग वर्ग आयोजित करण्यात आला आहे.
रात्रीच्या सांस्कृतिक सत्रात कला, साहित्य आणि संगीताची पर्वणी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. योगिता गोडबोले आणि संदीप उबाळे यांचे सुगम संगीत, प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांचा ‘मर्मबंधनातली ठेव’ कार्यक्रम, तसेच पं. भुवनेशकुमार कोमकल्ली यांचे उपशास्त्रीय गायन होणार आहे. सोमवार (दि. 8) डिसेंबर रोजी ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांचे ‘सध्याचा सामर्थ्यशाली भारत’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. याचबरोबर संकर्षण-स्पृहा यांचे विशेष सादरीकरण आणि योगेश सोमण यांचा ‘आनंदडोह’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार (दि. 9) सायंकाळी ‘महासाधू श्री मोरया गोसावी महाराज जीवनगौरव पुरस्कार’ डॉ. प्रमोद चौधरी यांना ज्येष्ठ उद्योजक अभय फिरोदिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
बुधवार (दि. 10) सोहळ्याची सांगता होईल. पहाटे साडेचार वाजता श्रींच्या संजीवन समाधीची महापूजा मंदार महाराज देव व चिंचवड बह्मवृंद यांच्या हस्ते संपन्न होईल. सकाळी सात वाजता पुष्पवृष्टी, नगारखाना आणि केरळी वाद्य पथकासह नगरप्रदक्षिणा केली जाईल. त्यानंतर सकाळी साडेनऊ ते साडे अकरा या वेळेत ह.भ.प. प्रमोद महाराज जगताप (बारामती) यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तनसेवा सादर होईल. दुपारी 12 वाजल्यापासून भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी मानवंदना ढोलताशा पथक, गंगा आरती आणि रात्री आठ वाजता आतषबाजीसह सोहळ्याची सांगता करण्यात येणार आहे.
श्रीमंत महासाधू श्री मोरया गोसावी महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना मंदार देव महाराज, माजी महापौर, मोरेश्वर शेडगे आदी.