

देहूगाव : राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होताच ऊसतोडीच्या ट्रॅक्टर-ट्रॉलींची वाहतूक प्रचंड वाढली आहे. एकाच ट्रॅक्टरला दोन-तीन ट्रॉली जोडून केली जाणारी वाहतूक धोकादायक ठरत आहे. नियमभंग आणि निष्काळजीपणामुळे अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
अपघातामध्ये वाढ
वडगावमध्ये रस्त्यावर उभा असलेल्या उसाच्या ट्रॉलीला धडक बसून दोन तरुणांचा मृत्यू झाल्यानंतर परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही दुर्घटना सोमवार (दि. 1) रोजी घडली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पहाटे (दि. 2) देहूरोड उड्डाण पुलाजवळ ट्रॅक्टर संरक्षक कठड्याला धडकून पलटी झाला. ट्रॉली रस्त्यावर पडल्याने निगडी-लोणावळा मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. देहूरोड वाहतूक पोलिसांनी ऊस बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली.
वाहतूककोंडीत भर
दरम्यान, महामार्गांवर तसेच गावांच्या मुख्य रस्त्यांवर अनेक ट्रॅक्टर-ट्रॉली रस्त्याच्याकडेला उभा ठेवण्यात येतात. अचानक दिसणाऱ्या या ट्रॉलींमुळे दुचाकी व चारचाकींना धडक होऊन अपघात वाढत आहेत. काही ठिकाणी ट्रॉली पलटी होण्याच्या घटनांमुळे वाहतूककोंडी तासन्तास कायम राहते. पोलिसांना रस्ता मोकळा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो.
नागरिकांकडून उपाययोजनेची मागणी
उसाची वाहतूक फक्त रात्री 9 ते पहाटे 5 या वेळेतच करावी
एकापेक्षा जास्त ट्रॉली जोडण्यास बंदी
ट्रॉलींमध्ये अतिभार टाकणाऱ्यांवर कडक कारवाई
रस्त्याच्याकडेला ट्रॉली उभा करण्यावर नियंत्रण व दंड
कारवाईची मागणी
वाहतूक तज्ज्ञांच्या मते, ट्रॅक्टरचा वेग कमी असणे, अतिरेकी उसाचा भार, दोन-तीन ट्रॉली जोडण्याची पद्धत तसेच रात्रीच्यावेळी प्रकाशयोजनेचा अभाव यामुळे धोका आणखी वाढतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून खालील उपाय तत्काळ राबवावेत, अशी जोरदार मागणी होत आहे. ट्रॅक्टर-ट्रॉली वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांनी नागरिक त्रस्त असून, नियमांची अंमलबजावणी न केल्यास परिस्थिती आणखी बिघडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.