जेजुरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन पाहणार्या श्री मार्तंड देवसंस्थान ट्रस्टवर धर्मादाय आयुक्त कार्यालयाने नियुक्त केलेल्या विश्वस्त मंडळाबाबत वाद होऊन जेजुरीकर ग्रामस्थांनी गेले 13 दिवस आंदोलन केले होते. धर्मादाय आयुक्त कार्यालयात पुनर्विचार याचिका देखील दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी होऊन आणखी चार स्थानिक विश्वस्त नियुक्त केले जातील, असे मान्य करण्यात आले. त्यामुळे जेजुरीकरांच्या आंदोलनाला यश मिळाले असून, हे आंदोलन रद्द करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले.
दि. 19 मे रोजी धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाने सात विश्वस्तांची नियुक्ती केली. या नियुक्तीमध्ये स्थानिक नागरिकांना न्याय मिळाला नाही. यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण होते. ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. सलग 13 दिवस धरणे आंदोलन करण्यात आले. ग्रामस्थांना न्याय न मिळाल्यास जेजुरी बेमुदत बंद व आक्रमक लढ्याचा निर्धार ग्रामस्थांच्या बैठकीत घेतला गेला. ग्रामस्थांच्या ठरावाचे पत्र धर्मादाय आयुक्त कार्यालयात देण्यात आले, तसेच पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली.
या याचिकेची सुनावणी बुधवारी (दि. 7) होऊन धर्मादाय आयुक्त कार्यालयाने आणखी चार स्थानिक विश्वस्त घेण्याबाबत मान्य केले. याबाबत नवीन विश्वस्त मंडळाने ठराव करावा, अशा सूचना दिल्या असल्याचे आंदोलक व ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, हेमंत सोनावणे व आंदोलकांनी सांगितले. जेजुरीकर आंदोलकांच्या मागणीचा विचार केला गेला व धर्मादाय आयुक्त कार्यालयाने सकारात्मकता दाखविल्याने ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेऊन भंडारा उधळून जल्लोष केला.
सायंकाळी नवनियुक्त विश्वस्त हे आंदोलनस्थळी आले. प्रमुख विश्वस्त पोपट खोमणे यांनी सहधर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुके यांना विश्वस्त मंडळाला कार्यालयात बोलावून घेऊन ग्रामस्थ आंदोलकांचा अर्ज वाचून दाखविला. विश्वस्त मंडळात आणखी चार विश्वस्तांची वाढ केली जाईल, याबाबत सहकार्य करण्याचा आदेश दिला. या आदेशाचे पालन विश्वस्त मंडळाकडून केले जाईल, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, आंदोलक हेमंत सोनावणे, संदीप जगताप, सुधीर गोडसे, गणेश आगलावे, संतोष खोमणे, अजिंक्य देशमुख, जयदीप बारभाई आदींसह शेकडोंच्या संख्येने जेजुरीकर आंदोलक, तसेच सर्व पक्षांचे कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा