जेजुरी: नाताळची सुटी आणि रविवारमुळे महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी जेजुरी गडावर गर्दी केली होती.
गुरुवार (दि. 25) पासून नाताळची सुटी सुरू झाल्याने राज्यातील सर्व तीर्थक्षेत्र, पर्यटनस्थळे, समुद्र किनारे भाविक व पर्यटकांनी फुलून गेले आहेत. जेजुरीचा खंडोबा हे लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असल्यामुळे जेजुरी येथील खंडोबा मंदिर व डोंगरावरील कडेपठार मंदिरात गेली तीन दिवसांपासून भाविकांची देवदर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. जेजुरी गडावर देवदर्शन आणि कुलधर्म-कुलाचारानुसार तळी-भंडार, जागरण-गोंधळ आदी विधींची रेलचेल होती.
भाविकांच्या अनुषंगाने शहरातील भंडार- खोबरे, प्रसाद, हार-फुले, फोटो, देवाचे टाक, हॉटेल्स, निवासस्थाने हाऊसफुल्ल झाली होती. जेजुरी गडावर भाविकांना सुलभ व लवकर दर्शन व्हावे, पाणी, स्वच्छता, सावली आदी सुविधा जेजुरी देवसंस्थानच्या वतीने उपलब्ध करण्यात आली असल्याचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे यांनी सांगितले.
नाताळ सुटीबरोबरच मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सहलीतून विद्यार्थ्यांचीही मोठी गर्दी गडावर पाहण्यास मिळाली. गर्दी नियंत्रण करणे, भाविकांना ये-जा करण्यासाठी पायरी मार्ग मोकळा करणे, भाविकांना सुरक्षा मिळावी यासाठी जेजुरीचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे व पोलिस कर्मचारी लक्ष घालून काम करत होते. जेजुरी, सासवड, मोरगाव रस्ता, निरा रस्ता व राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक नियंत्रित करण्याचे काम पोलिस करीत होते.
जेजुरी गड, पायरी मार्ग, ऐतिहासिक चिंचेची बाग, कऱ्हा नदी परिसर, पुजारी सेवकवर्ग यांच्या निवासस्थानी भाविक देवकार्य करीत होते. देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या अनुषंगाने पुणे-पंढरपूर महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ होती.