JEE Pudhari
पुणे

JEE Mains CAP Admission 2026: अभियांत्रिकी प्रवेशासाठी दिलासा! जेईई मेन्स गुण अपडेटचा मार्ग मोकळा; सीईटी सेलने तांत्रिक अडचण दूर केली

डिजिलॉकरमधील नावातील तफावतीचा प्रश्न निकाली; १६ जुलैपर्यंत अर्जात जेईई मेन्स गुण समाविष्ट करण्याची संधी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत एमएचटी सिईटी गुणांसह जेईई मेन्सच्या गुणांना देखील महत्त्व आहे. परंतु, अनेक विद्यार्थ्यांना जेईई मेन्सचे गुणांचा अर्जात समावेशच करता येत नव्हता. अखेर सीईटीसेल आणि एनटीए यांनी एकत्रित येत विद्यार्थ्यांना येणारी तांत्रिक अडचण दूर केली आहे. त्यामुळे अभियांत्रिकीसाठी आवश्यक जेईई मेन्सच्या गुण भरण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाइन नोंदणीसाठी १६ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. संबंधित प्रवेश प्रक्रियेसाठी एमएचटी-सीईटी तसेच जेईई मेन्स परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात. एनटीए, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाइन अर्जामध्ये उमेदवारांचे जेईई परीक्षेतील गुण डिजिलॉकरद्वारे थेट प्राप्त करण्यात येत आहेत.

परंतु, काही उमेदवारांच्या जेईई गुणपत्रकावरील नाव व डिजिलॉकरमधील नावामध्ये तफावत असल्यामुळे जेईई परीक्षेतील गुण प्राप्त करताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे सीईटीसेलने एनटीए, नवी दिल्ली यांच्याशी समन्वय साधून संबंधित तांत्रिक अडचण दूर केली आहे. त्यामुळे, ज्या उमेदवारांना यापूर्वी जेईई परीक्षेतील गुण प्राप्त करताना अडचणी येत होत्या, त्यांनी कॅप पोर्टलवरील लॉगिनमध्ये जाऊन जेईई मेन्स परीक्षेतील गुण प्राप्त करून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.

ज्या उमेदवारांनी जेईई मेन्स परीक्षेतील गुण कॅप अर्जामध्ये समाविष्ट करून अर्जाची निश्चिती प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, ते उमेदवारदेखील आपला अर्ज अनलॉक करून जेईई मेन्स परीक्षेतील गुण प्राप्त करून अर्जामध्ये आवश्यक ती दुरुस्ती करू शकतील. ई-स्क्रूटिनीद्वारे अर्जाची निश्चिती केलेल्या उमेदवारांनी अर्ज अनलॉक करण्यासाठी हरकत नोंदवावी.

तसेच, प्रत्यक्ष स्क्रूटिनीद्वारेअर्जाची निश्चिती केलेल्या उमेदवारांनी अर्ज अनलॉक करण्यासाठी संबंधित सेवा सुविधा केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन अर्ज दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण करावी. दिलेल्या मुदतीत अर्ज प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या उमेदवारांचा समावेश गुणवत्ता यादीमध्ये करण्यात येणार नसल्याचे सीईटी सेलच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT