पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : जागा ताब्यात न घेता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व तत्कालीन आयुक्त दिलीप बंड यांनी घाईघाईत पवना धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पिंपरी-चिंचवड शहरासाठी पाणी आणण्याच्या प्रकल्पाची निविदा काढली. त्यानंतर झालेल्या गोळीबारात शेतकर्यांचे बळी गेले. त्यामुळे प्रकल्पाचा हा मुद्दा भावनिक आहे. सर्वांना विश्वासात घेणे गरजेचे आहे, असे खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी (दि.15) पत्रकार परिषदेत सांगितले.
महापालिकेचा पवना जलवाहिनीचा प्रकल्प तब्बल 12 वर्षांपासून रखडला आहे. शेतकर्यांनी मागणी केल्यानुसार पवना नदीवर पालिका गहुंजे व शिवणे येथे कोल्हापुरी पद्धतीचे दोन बंधारे बांधत आहे. आता प्रकल्प राबविण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहमती का देत नाहीत, या प्रश्नावर ते बोलत होते. बारणे म्हणाले, 'पवना धरणातील गाळ अनेक वर्षांपासून काढला जात असल्याने तेथे 1 टीएमसी पाणी अधिक जमा होत आहे. पालिकेतर्फे दोन बंधारे बांधण्यात येत आहेत.' त्याबाबत आयुक्तांसोबत बैठक घेतली.
पाणी शुद्ध मिळावे म्हणून शिवणे बंधार्यापासून शहरासाठी पाणी उचलावे, अशी सूचना केली आहे. आंद्रा धरणातून शहराला 100 एमएलडी अतिरिक्त पाणी मिळत आहे. पवना बंद जलवाहिनीचा मुद्दा भावनिक आहे. शेतकर्यांवर कोणी गोळीबार केला हे सर्वांना माहीत आहे. सर्वांना विश्वासात घेऊन त्याबाबत योग्य तोडगा काढावा लागणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गास लवकरच केंद्राची अंतिम मान्यता मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्राधिकरणाच्या 12.5 टक्के परताव्याच्या विषयाला पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळेल, असा दावा त्यांनी केला. निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्पाशेजारी जागा सार्वजनिक कार्यक्रमासाठी राखीव ठेवण्यासाठी आग्रही असल्याचे ते म्हणाले. त्या व्यापारी जागेची निविदाप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांना जाग आल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. प्रशासकीय राजवटीत घरटी दरमहा 60 रुपये उपयोगकर्ता शुल्क लागू करण्यास विरोध केल्याचे त्यांनी सांगितले.
थेरगाव येथील पद्मजी पेपर मिलशेजारी आयोजित 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमास तसेच, प्राधिकरण, निगडी येथील महात्मा बसवेश्वर महाराज पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी (दि.16) दुपारी दोनला पिंपरी-चिंचवड शहरात येत आहेत, असे खा. बारणे यांनी सांगितले.
घरी बसून उठसूठ टीका करणे सोपे आहे. त्याचे तोंड दाबता येत नाही. आम्ही काम करीत असल्याने चुका होतात. वृत्तपत्रातील जाहिरातीबाबत अधिक बोलून मी वाद वाढविणार नाही. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला आहे, असे खा. बारणे म्हणाले. युती झाली त्या वेळेस शिवसेनेच्या जागा शिवसेनेला मिळतील, हा फार्म्युला ठरला आहे. त्यानुसार, 2024 च्या लोकसभा निवडणूक होतील. मावळ मतदारसंघासाठी भाजपकडून अनेक जण इच्छुक असणे स्वाभाविक आहे. पक्ष विस्तारासाठी सर्वच जण प्रयत्न करतात, असे सांगून भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढणार या चर्चेचे त्यांनी खंडन केले.
हेही वाचा