अहमदनगर : लांबलेला पाऊस महापालिकेच्या पथ्यावर; नालेसफाई संथ गतीने | पुढारी

अहमदनगर : लांबलेला पाऊस महापालिकेच्या पथ्यावर; नालेसफाई संथ गतीने

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : पावसाळा चार दिवसांवर येऊन ठेपला तरी अद्याप महापालिकेकडून नालेसफाई अत्यंत संथगतीने सुरू आहे. दुसरीकडे लाखो रुपये खर्च करून महापालिकेने घेतलेले जेसीबी, पोकलेन मशीन चालकाअभावी जागेवर उभे आहे. चालक उपलब्ध करून नालेसफाई करण्यात येईल, अशी पदाधिकारी व अधिकार्‍यांची वल्गना हवेत विरली आहे. दरम्यान, नालेसफाई अद्याप पूर्ण झाली नसली, तरी पाऊस लांबल्याने त्याचा फटका शहरवासीयांना बसलेला नाही. त्यामुळे लांबलेला पाऊस महापालिकेच्या पथ्यावर पडल्याचे बोलले जात आहे.

महापालिकेच्या हद्दीत सुमारे 15 महत्त्वाचे ओढे-नाले आहेत. एप्रिल-मेमध्ये दरवर्षी 25 लाख रुपये खर्च करून नालेसफाई केली जाते. तरीही पावसाळ्यात नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात घुसते. शहरातील 45 ओढ्यांवर पाईप टाकून अतिक्रमणे करण्यात आल्याचे मनपाने केलेल्या सर्वेेक्षणात स्पष्ट झाले आहे. नाल्यांवर पाईप टाकून रस्ते करण्यात आले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात नाले तुंबून नागरिकांच्या घरात पाणी घुसते. यंदा अवघ्या तीन नाल्यांची सफाई पूर्ण झाली आहे.

त्यात औरंगाबाद रस्त्यावरील सनी पॅलेस पाठीमागून वाहणारा नाला, खोकर नाला (आगरकर मळा) व सीना नदीची सफाई करण्यात आली आहे. मात्र, उर्वरित नाल्यांची सफाई शून्य आहे. जेसीबी, पोकलेनअसूनही खासगी ठेकेदारामार्फत नालेसफाई सुरू करण्यात आली आहे. महापालिकेच्या जेसीबी व पोकलेनला चालक नसल्याचे समजते. महापालिकेने स्वतः मशिनरीने नालेसफाई करावी, अशी मागणी सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केली होती.

त्या वेळी आयुक्तांनी जेसीबीला तत्काळ चालक उपलब्ध करून नालेसफाई करण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, अद्याप महापालिकेला जेसीबी व पोकलेनला चालक मिळालेला नाही. त्यामुळे ठेकेदारामार्फत नालेसफाई करण्यात आली आहे. आयुक्त व मनपा पदाधिकार्‍यांनी दिलेली आश्वासने हवेतच विरली असे बोलले जाते.

मनपाचे लाखो रुपये वाया

महापालिकेने लाखो रुपये खर्च करून खरेदी केलेले जेसीबी व पोकलेनसारखी वाहने चालकांअभावी उभी आहेत. पावसाळा तोंडावर आला तरी नालेसफाईला गती नाही. महापालिकेने लाखो रुपये खर्च करून मशिनरी खरेदी कशासाठी केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Back to top button