intellectual disability Pudhari
पुणे

Maharashtra Disability Diagnosis Scheme: बौद्धिक विकलांगता पूर्वनिदान योजना ‘दोन वर्षांपासून’ अडकली!

नवीन योजना मंजुरीअभावी रखडल्या; थेरपी, उपचार, मदतनीस भत्ता आणि विमा योजनांचे प्रश्न कायम — दिव्यांग बालकांच्या हक्कांवर गंडांतर; दिव्यांग संघटनांचा संताप

पुढारी वृत्तसेवा

पुणे: दिव्यांगांसाठी असलेल्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन झाले. मात्र, अनेक प्रचलित योजना कालबाह्य पद्धतीने राबवल्या जात आहे. तर, नवीन योजनाही मंजुरीसाठी शासनाकडे प्रलंबित आहेत. बौद्धिक विकलांग बालकांमधील विकलांगतेच्या प्रतिबंधासाठी पूर्व निदान हस्तक्षेप योजनेचा प्रस्ताव शासनाकडे दोन वर्षांपासून प्रलंबित आहे.

सुधारित कायद्यानुसार दिव्यांग व्यक्तींच्या 21 प्रवर्गांना मान्यता मिळाली. मात्र, बौद्धिक विकलांग यामध्ये कायम दुर्लक्षित राहिले आहेत. दिव्यांगता येऊ नये, यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची असूनही दुर्लक्षित राहिली आहे.

बौद्धिक विकलांगतेमध्ये प्रामुख्याने सेरेबल पाल्सी, मतिमंदत्व, बहुविकलांग आणि स्वमग्नता यांचा समावेश होतो. बौद्धिक विकलांगता येऊ नये, यासाठी पूर्वनिदान योजना महत्त्वाची असल्याने शासनाने याबाबत तातडीने प्रक्रिया करण्याची मागणी दिव्यांग संघटनांकडून होत आहे.

राष्ट्रीय न्यास कायदा (1999) नुसार दिव्यांगांसाठी विविध प्रवर्ग जाहीर करण्यात आले. नव्वदच्या दशकानंतर पुनर्वसनासाठी अनेक कायदे आले. बौद्धिक दिव्यांगत्वाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे 1999 मध्ये स्वतंत्र कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर, शासनाने 2016 च्या सुधारित कायदा अस्तित्वात आला. मात्र, अजूनही 100 टक्के अंमलबजावणी होत असल्याने हा वर्ग सुविधांपासून वंचित राहिला आहे.

काय आहे योजना?

बौद्धिक विकलांगता लवकर ओळखून तिची तीवता कमी करण्यासाठी ही योजना प्रस्तावित आहे. जन्मापासूनच किंवा बाल्यावस्थेत दिसणाऱ्या मानसिक-बौद्धिक विकासातील उशिरावर वेळीच हस्तक्षेप करून मुलांचा विकास साधण्याचा या योजनेचा उद्देश आहे.

दिव्यांगत्व येऊच नये म्हणून उपाययोजना करणे आवश्यक आहेच; पण ज्यांना दिव्यांगत्व आले आहे त्यांच्यासाठी देखील गरजेनुसार योजना राबवणे तेवढेच महत्त्वाचे आहे. बौद्धिक दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी विविध प्रकारच्या थेरपीसोबतच त्यांना मदतनीसाची नितांत गरज आहे. त्यामुळे दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेत बौद्धिक दिव्यांगांसाठी मदतनीस भत्ता योजना सुरू केली पाहिजे. जेणेकरून त्यांच्या देखभालीकडे योग्य पद्धतीने लक्ष दिले जाईल.
हरिदास शिंदे, अध्यक्ष, संयुक्त दिव्यांग हक्क सुरक्षा समिती, पुणे

योजनेचा मुख्य उद्देश -

  • बौद्धिक विकलांगतेची लवकर ओळख पटवणे

  • योग्य उपचार, प्रशिक्षण व थेरपीद्वारे विकलांगतेची तीवता कमी करणे

  • बालकाला शक्य तितका स्वावलंबी बनवणे

  • पालकांना मार्गदर्शन व समुपदेशन देणे

योजनेअंतर्गत कोणत्या सेवा दिल्या जातात?

  • मानसिक व विकासात्मक तपासणी

  • स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी

  • विशेष शिक्षण

  • पालक समुपदेशन व प्रशिक्षण

  • गरजेनुसार संदर्भ सेवा

बौद्धिक दिव्यांगांसाठी राष्ट्रीय न्यास कायद्यानुसार राबविण्यात येणाऱ्या निरामय आरोग्य विम्याची आर्थिक मर्यादा खर्चाच्या तुलनेत कमी आहे. उपचारासाठी झालेल्या खर्चाचा परतावा मिळवण्यासाठी खूप किचकट प्रक्रिया आहे. बौद्धिक दिव्यांगांच्या रक्ताच्या नातेवाईकांनासुद्धा कायदेशीर पालकत्व घ्यावे लागते. यासाठी काही नात्यांना त्याचे संगोपन बंधनकारक असले पाहिजे. कारण बौद्धिक दिव्यांग मुलींचे प्रश्न खूपच गुंतागुंतीचे असतात.
बौद्धिक दिव्यांग मुलीचे पालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT