पुणे

पिंपरी : इंद्रायणीनगर मंडईतील गाळे रिकामेच

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : महानगरपालिकेच्या इंद्रायणीनगर येथील भाजी मंडईतील 90 गाळे गेल्या दीड वर्षापासून वापराशिवाय पडून आहेत. या गाळ्यांमध्ये भाजी विक्रेत्यांनी बसणे अपेक्षित असताना ते मंडईच्या बाहेर बसून भाजी विक्रीचा व्यवसाय करीत आहेत.
त्यामुळे मंडईतील गाळे रिकामे आणि मंडईबाहेर अतिक्रमण असे चित्र पाहण्यास मिळत आहे.

इंद्रायणीनगर येथे बांधलेल्या भाजी मंडईतील गाळे वाटपासाठी दीड वर्षापूर्वी अर्ज मागविण्यात आले होते. या गाळ्यांची सोडत काढून भाजी विक्रेत्यांना रक्कम भरण्यासाठी मुदत देण्यात आली. त्यानुसार, भाजी विक्रेत्यांनी भाडेकरारनामा करण्यासाठी पैसे देखील भरले. तथापि, ते भाजी विक्रेते व्यवसाय करीत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्याऐवजी भाजी मंडईबाहेरील मोकळ्या जागेत भाजी विक्रेते, फळ विक्रेते व्यवसाय करीत आहेत.

भाजी मंडईतील स्वच्छतेकडे दुर्लक्ष

इंद्रायणीनगर येथे वापराशिवाय पडून असलेल्या भाजी मंडईत अस्वच्छता पाहण्यास मिळत आहे. येथे प्लास्टिकच्या बाटल्या व अन्य कचरा पडलेला असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. त्याचप्रमाणे, भाजी आणि फळ विक्रेते उघड्यावर व्यवसाय करीत असल्याने तेथे देखील अस्वच्छता पाहण्यास मिळते. येथील कचराकुंडीत मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे.

भाजी विक्रेत्यांचे करावे सर्वेक्षण

पाऊस सुरू झाल्यानंतर भाजी खरेदी करण्यासाठी येणार्‍या नागरिकांची मोठी गैरसोय होते. परिसरात पावसाचे पाणी साचते. इंद्रायणीनगर परिसरात पदपथावर व मुख्य रस्त्यावर भाजीपाला व फळविक्रेते बसतात. त्यांचे सर्वेक्षण करून त्यांना प्राधान्याने भाजी मंडईमध्ये गाळेवाटप करायला हवे. त्यामुळे भाजी मंडई पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकेल, अशी नागरिकांची मागणी आहे.

इंद्रायणीनगर भाजी मंडईतील गाळे वापराशिवाय पडून आहेत. तेथे अस्वच्छता पाहण्यास मिळते. दुसर्‍या छायाचित्रात भाजी मंडईबाहेर भाजी आणि फळविक्रेते व्यवसाय करीत असल्याचे चित्र पाहण्यास मिळते.

इंद्रायणीनगर भाजी मंडईत भाजी विक्रेत्यांना गाळ्यांचे वाटप करण्यात आलेले आहे. तरीही, भाजी विक्रेते मंडईबाहेर बसतात. याबाबत तक्रार आल्यास संबंधितांच्या विरोधात अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात येईल.

– अण्णा बोदडे, 'क' क्षेत्रीय अधिकारी

भाजी मंडईतील गाळ्यांचे दीड वर्षापूर्वीच वाटप झालेले आहे. ज्या भाजी विक्रेत्यांनी करारनामे करून घेतले आहे. तसेच, त्यासाठी आवश्यक रक्कम महापालिकेकडे भरली आहे, त्यांनी संपर्क साधावा. अन्यथा, त्यांचे गाळे रद्द करण्यात येतील.

– मुकेश कोळप, प्रशासन अधिकारी, भूमी आणि जिंदगी विभाग.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT