कॅनडातील हिंदू दहशतीखाली : खा. चंदा आर्य यांची स्‍पष्‍टोक्‍ती | पुढारी

कॅनडातील हिंदू दहशतीखाली : खा. चंदा आर्य यांची स्‍पष्‍टोक्‍ती

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कॅनडामधील खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जर याच्‍या हत्‍येमध्‍ये भारताचा संबंध असल्‍याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला आहे. त्‍याच्‍या या निराधार आरोपचा समाचार कॅनडाचे खासदार चंद्रा आर्य यांनी घेतला आहे. तसेच खलिस्तान चळवळीशी संबंधित नेते कॅनडातील हिंदू आणि शीखांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. कॅनडात राहणारे अनेक हिंदू दहशतीखाली आहेत, असेही त्‍यांनी म्‍हटले आहे. ( Hindus under terror in Canada )

खलिस्तानी नेता हरदीप सिंह निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडाच्या संबंधात तणाव वाढला आहे. निज्जर यांच्या हत्येत भारताचा हात असू शकतो, असा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सोमवारी संसदेत बोलताना केला होता. कॅनडाने भारताच्या वरिष्ठ मुत्सद्द्याला देश सोडण्याचे आदेश दिले. या सगळ्या घडामोडींवर लिबरल पार्टी ऑफ कॅनडाचे नेते आणि इंडो-कॅनेडियन खासदार चंद्रा आर्य यांनी आपली भूमिका स्‍पष्‍ट केली आहे.

कॅनडामधील हिंदूंना सावध राहण्याचे आवाहन

चंद्रा आर्य यांनी म्‍हटले आहे की, काही दिवसांपूर्वी कॅनडातील खलिस्तान चळवळीचे नेते शीख फॉर जस्टिसचे अध्यक्ष गुरपतवंत सिंग पन्नू याने हिंदू-कॅनडीयांवर हल्ला केला. कॅनडा सोडा आणि त्यांना भारतात परत जाण्यास सांगण्यात आले. या हल्ल्यानंतर कॅनडात राहणारे अनेक हिंदू भयभीत झाले आहेत. मी त्‍यांना सावध राहण्‍याचे आवाहन करतो.

कॅनेडियन शीख बांधव खलिस्तान चळवळीला समर्थन देत नाहीत

उकचंद्र आर्य यांनी म्‍हटले आहे की, कॅनडातील हिंदू आणि शीख समुदायांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. “मी हे स्पष्ट करू इच्छितो की आमचे बहुसंख्य कॅनेडियन शीख बांधव खलिस्तान चळवळीला समर्थन देत नाहीत. बहुतेक शीख कॅनेडियन अनेक कारणांमुळे खलिस्तान चळवळीचा जाहीर निषेध करू शकत नाहीत. हिंदू-कॅनेडियन समुदायामध्‍ये सलोख्‍याचे संबंध आहे. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली दहशतवादाचा गौरव करणे किंवा कोणत्याही धार्मिक गटाला लक्ष्य करणे याला परवानगी कशी आहे?, असा सवालही त्‍यांनी केला आहे.

हिंदू फोरम संघटनेचे सुरक्षेसाठी सार्वजनिक सुरक्षा मंत्र्यांना पत्र

कॅनडामधील हिंदू फोरम संघटनेने कॅनडाचे सुरक्षा मंत्री डॉमिनिक लेब्लँक यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्‍ये त्‍यांनी खलिस्तानींच्या धमक्या लक्षात घेऊन हिंदू समुदायाला संरक्षण देण्याची मागणी केली आहे. हिंदू फोरम कॅनडा ही कॅनडामधील अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी निर्माण केलेली एकमानवतावादी संस्था आहे.

भारताने दहशतवादी म्‍हणून जाहीर केलेला गुरपतवंत पन्नू याने एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्‍ये त्‍याने इंडो-कॅनेडियन लोकांना कॅनडा सोडण्याची धमकी दिली आहे.’कॅनडामध्ये राहणाऱ्या हिंदूंनी लवकरात लवकर येथून निघून जावे, असे त्‍याने या व्‍हिडिओमध्‍ये म्‍हटले आहे.

द्वेषपूर्ण व्हिडिओंमुळे आमची चिंता आणखी वाढली

हिंदू फोरम कॅनडाने पत्रात म्‍हटले आहे की, ‘आम्ही अधिकाऱ्यांना हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची विनंती करतो. याचा थेट परिणाम कॅनडातील नागरिकांवर होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या द्वेषपूर्ण व्हिडिओंमुळे आमची चिंता आणखी वाढली आहे. आम्हाला विश्वास आहे की कॅनडाचे अधिकारी या प्रकरणी निर्णायक पावले उचलतील.’
कॅनडामध्ये राहणारे भारतीय वंशाचे विद्यार्थी आणि तेथे प्रवास करण्याची योजना आखणाऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कॅनडामधील विद्यार्थी आणि भारतीय वंशाच्या लोकांनाही धार्मिक स्थळांना भेट देण्याचे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हेही वाचा

Back to top button