पुणे : रहिवासी इमारती, औद्योगिक संकुले, डेटा सेंटर आणि गोदामांच्या उभारणीसाठी आघाडीच्या सोळा शहरांमध्ये तब्बल 126 व्यवहारांत 7 हजार 772 एकर जमिनींचे व्यवहार झाले आहेत. त्यातील 20 टक्क्यांहून अधिक व्यवहार मुंबई आणि पुण्यातील आहेत.
आर्थिक राजधानी मुंबईत 32 व्यवहारांमध्ये 500.46 एकरचे व्यवहार झाले आहेत, तर बेंगळुरूमध्ये 27 व्यवहारांत 454.52 एकर जमिनींचे व्यवहार झाले आहेत. या दोन शहरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वेगाने औद्योगिक आणि रहिवासी कारणासाठी जागांना वाढती मागणी आहेत. तर, पुणे शहरात 18 व्यवहारांत मिळून 308.49 एकरचे व्यवहार करण्यात आले आहेत. पुण्यात रहिवासी, औद्योगिक, गोदामे यामध्ये अधिक गुंतवणूक होत असल्याचे ॲनारॉक या बांधकाम विश्लेषक संस्थेच्या ताज्या अहवालात म्हटले आहे.
वेगाने पुढे येणाऱ्या शहरांमध्ये 16 व्यवहारांत 2 हजार 192.8 एकरचे करार झाले आहेत. कोईम्बतूर येथे 714 एकर, अहमदाबादमध्ये 603.67 आणि अमृतसरमध्ये 520 एकरचे व्यवहार झाले आहेत. या शहरांत महानगरांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर विकासकामे होत आहेत. महाराष्ट्रातील नागपूरमध्येही दोन व्यवहारांत मिळून 81 एकरची जमीन घेतली आहे. नवी दिल्लीत 137.22, चेन्नई 121.85 आणि हैदराबादमध्ये 57 एकर जमिनींवर विकासकामे सुरू आहेत. महानगरामध्ये कोलकाता येथे एकही महत्त्वाचा जमीन व्यवहार झालेला नाही.
देशातील महानगरे आणि वेगाने पुढे येणाऱ्या शहरांत झालेल्या 126 व्यवहारांत 3,772.04 एकर जमिनींचे व्यवहार झाले आहेत. त्यातील 1,877 एकर जमिनींवर रहिवासी संकुल उभारण्यात येणार आहे. तर, 597.34 एकर जागेवर औद्योगिक संकुले उभी राहत आहेत. डेटा सेंटर 79 एकर, गोदामे 107 आणि मिश्र कारणांसाठी 1 हजार 45 एकर जमिनीचा वापर होणार आहे.