

पुणे : महापालिका निवडणुकीप्रमाणेच पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत युती-आघाडीत गोंधळाचे चित्र पाहायला मिळाले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत कोण कुणासोबत आणि कोण कुणाच्या विरोधात लढणार, हे स्पष्ट झाले नव्हते. त्यामुळे कार्यकर्त्यांसह इच्छुक उमेदवारही संभमात होते. महापालिका निवडणुकीत दिसलेला युती व आघाडीचा एकत्र लढण्याचा तिढा या वेळीही कायम राहिला. याचा थेट परिणाम उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेवर झाला.
पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, काँग्रेस आणि शिवसेना या प्रमुख पक्षांमध्ये युती व आघाडीबाबत शेवटपर्यंत अनिश्चिततेचे वातावरण होते. महापालिका निवडणुकीप्रमाणेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही भाजपने शिवसेनेला शेवटपर्यंत झुलवत ठेवल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी केला आहे.
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीत दोन चिन्हांमुळे मतदारांचा गोंधळ उडाला होता. तो टाळण्यासाठी जास्तीत जास्त जागांवर ‘घड्याळ’ या चिन्हावर निवडणूक लढविण्यात येत असल्याचे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आले आहे. शिवसेनेचे नेते व आमदार विजय शिवतारे तसेच जिल्हाध्यक्ष
रमेश कोंडे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. ’युतीसाठी भाजपकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळाला नाही. जागावाटपाबाबत चर्चा करू, असे सांगण्यात आले. मात्र, शेवटपर्यंत कोणताही निर्णय कळविण्यात आला नाही. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा शिवसेना स्वबळावर लढवणार आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद म्हणाले, ’युतीचा निर्णय वरिष्ठपातळीवर होणार होता. आम्ही निवडणूक तयारीत व्यस्त होतो. जिल्ह्यातील सर्व जागांवर भाजप निवडणूक लढवत आहे.’
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष विजय कोलते यांनी सांगितले की, बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या बहुतांश जागांवर दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे उमेदवार ’घड्याळ’ या चिन्हावर एकत्र लढत आहेत. मात्र, खानापूर येथील पंचायत समितीची एक जागा तसेच मुळशी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन आणि पंचायत समितीच्या चार जागांवर ’तुतारी’ या चिन्हावर उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. अंतिम चर्चा होण्यापूर्वीच एबी फॉर्म दिल्याने या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम म्हणाले की, “आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट) आणि कम्युनिस्ट पक्षासोबत आघाडी करून निवडणूक लढवत आहे. जिल्हा परिषदेसाठी तीन व पंचायत समितीसाठी तीन जागांवर ’तुतारी’ या चिन्हावर उमेदवार उभे आहेत.”
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण म्हणाले, ठरल्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाबाबत अंतिम चर्चा पूर्ण झाली आहे. शेवटच्या दिवशी तालुकाध्यक्षांशी समन्वय साधून एबी फॉर्म उमेदवारांपर्यंत पोहचविण्यात आले आहेत.