Indapur Woman Gold Returns Pudhari
पुणे

Indapur Woman Gold Returns: इंदापूरमध्ये 20 तोळे सोन्याची बॅग परत; प्रामाणिकपणाचा आदर्श

लता वाबळे यांनी सोन्याची बॅग मूळ मालकाला परत करून समाजासमोर ठेवला प्रेरणादायी आदर्श

पुढारी वृत्तसेवा

भिगवण: आजच्या महागाईच्या काळात पैसा महत्वाचा झाला आहे पण तो सहजासहजी मिळाला तर? कोणी सोडेल काय? आणि त्यातही जर ते चक्क ३० लाख रुपये असतील तर? अर्थात रस्त्यावर अशी हरवलेली वस्तू परत मिळणे अवघड मानली जाऊ शकते; मात्र इंदापूर तालुक्यातील पिंपळे येथील एका महिलेने तब्बल २० तोळे सोन्याचे दागिने मूळ मालकाला परत करून लाख मोलाचा प्रामाणिकपणाचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

या घटनेमुळे परिसरात त्या महिलेचे सर्वत्र कौतुक होत आहे. लता सुनील वाबळे (रा. पिंपळे फाटा, ता. इंदापुर) असे या प्रामाणिक महिलेचे नाव आहे. भर रस्त्यात सापडलेली २० तोळे वजनाची सापडलेली बॅग तिने परत मूळ मालकाला स्वाधीन केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अकोले (ता. इंदापुर) येथील एक कुटुंब बुधवारी (दि. १३) पिंपळे येथील पद्मावती मंदिरात देवीच्या देवदर्शनासाठी आले होते. दर्शन घेऊन परत घरी आल्यानंतर त्यांना धक्का बसला, कारण त्यांच्याकडे सोबत असलेले २० तोळे सोने असलेली बॅगच त्यांना आढळून आली नाही. त्यामुळे त्यांनी विना विलंब आल्या रस्त्याने बॅगची शोधाशोध सुरू केली. अगदी ज्या पिंपळाच्या देवीच्या दर्शनासाठी आले तिथपर्यंत शोध घेतला पण पदरी निराशा आली.

याच दरम्यान लता वाबळे यांना पद्मावती मंदिराजवळ नागरिक जमल्याची व कोणाची तरी सोने असलेली बॅग हरवल्याची चर्चा कानावर पडली. लता यांनी कसलीही उसंत न घेता नागरिक जमलेल्या ठिकाणी धाव घेतली आणि सकाळी ११ वाजता आपल्याला सोने असलेली बॅग सापडल्याची माहिती प्रामाणिकपणे दिली. हे शब्द ऐकताच आत्तापर्यंत धास्तावलेल्या त्या कुटुंबाच्या जीवात जीव आला. त्यानंतर उपस्थित नागरिकांच्या साक्षीने हरवलेले लाख मोलाचे सोने लता यांनी संबधित कुटुंबाच्या स्वाधीन केले.

या प्रामाणिक घटनेचे कौतुक उपस्थित असलेल्या नागरिकांनी केले. शिवाय ही बाब भिगवण पोलिसांच्या कानावर आली आणि लता व सुनील या दाम्पत्याच्या प्रामाणिकपणाची दखल घेऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे, पोलिस उपनिरिक्षक अमित पाटील तसेच निश्चल शितोळे, विठ्ठल वारगड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक संतोष वाबळे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT