पुणे : पहाटेच्या वेळी दरोडा टाकून लुटणाऱ्या टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे शाखा आणि इंदापूर पोलिसांनी अटक केली. आबा आप्पा शिंदे (वय 35), सुनील भीमा पवार, अजय उन्नेश्वर गवळी (रा. तिघे मोहा, ता. कळंब, जि. धाराशीव) अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे असून, त्यांच्यावर विविध जिल्ह्यात मालमत्ता चोरीचे गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने 1 जानेवारीपर्यंत आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे.
15 डिसेंबर रोजी इंदापूर तालुक्यातील विठ्ठलवाडी गावात सिंधू भोंग यांच्या घरी पहाटे साडेचार वाजता आरोपींनी दरोडा टाकला होता. सिंधू, त्यांचे पती पांडुरंग आणि बहीण मुक्ताबाई ननवरे यांना मारहाण करून सोन्याचे दागिने हिसकावले होते. तसेच बागल फाटा, बावडा येथे एका महिलेचे मंगळसूत्र जबरदस्तीने चोरले होते. दोन्ही घटनांत आरोपींनी सोन्याचे दागिने, रोकड आणि टीव्ही असा 91 हजार रुपयांचा ऐवज लुटून पळ काढला होता.
याप्रकरणी, सिंधू भोंग यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, इंदापूर पोलिस ठाण्यात अज्ञात दरोडेखोरांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरोडेखोर चारचाकी मोटारीतून आले होते. एवढी माहिती पोलिसांच्या हाती होती. स्थानिक गुन्हे शाखा आणि इंदापूर पोलिस तपास करत असताना सीसीटीव्हीत पांढऱ्या रंगाच्या दोन स्कॉर्पिओ गाड्या दिसून आल्या. पोलिसांना हा गुन्हा कळंब तालुक्यातील मोहा गावात राहणाऱ्या आबा शिंदे आणि त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांनी तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने शिंदे याला ताब्यात घेतले. त्यावेळी सुनील आणि अजय या दोघांची नावे समोर आली. हे दोघे रत्नागिरीतील गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यात होते. त्या दोघांना पुणे ग्रामीण पोलिसांनी आपल्या गुन्ह्यात वर्ग करून अटक केली. ही कामगिरी पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, विलास नाळे, सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांच्या पथकाने केली.
किरकोळ कारणातून एक महिन्यापूर्वी झालेल्या वादातून एकाचा खून करून फरार झालेल्या दोघांना उरुळी कांचन पोलिसांनी सोलापूर येथून अटक केली. स्वप्नील शिवाजी चौधरी, आदेश रेवलनाथ चौधरी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, तर संपत तुकाराम चौधरी (वय 48, रा. वडाचीवाडी) यांचा खून झाला होता.19 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पेठ गावच्या हद्दीत, थेऊर ते पेठ रोडलगत येथील म्हसोबा मंदिराजवळील शेतात संपत चौधरी यांचा मृतदेह मिळून आला होता.
अज्ञात व्यक्तीने कोणत्यातरी हत्याराने त्यांचा खून केला होता. याप्रकरणी, खुनाचा गुन्हा दाखल करून उरुळी कांचन पोलिस आरोपींचा शोध घेत होते. 29 डिसेंबर रोजी संशयित आरोपी सोलापूर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. संपत आणि स्वप्नील या दोघांत वाद होता. त्यातून गुन्हे देखील दाखल होते. ही कामगिरी पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सचिन वांगडे, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, उपनिरीक्षक प्रवीण कांबळे, अमित सिद-पाटील, कर्मचारी योगेश नागरगोजे, अजित भुजबळ, राजू मोमीन यांच्या पथकाने केली.