

पुणे : पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ मुलींच्या हॉकी स्पर्धेत आयटीएम विद्यापीठ ग्वाल्हेर संघाने तीन विजयांसह स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. रविंद्रनाथ टागोर विद्यापीठ भोपाळ संघाने व्दितीय तर, पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तिसरा क्रमांक मिळवला.
आयटीएम विद्यापीठ ग्वाल्हेर संघाने रविंद्रनाथ टागोर विद्यापीठ भोपाळ संघाचा २-१ असा तर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाचा १-० असा आणि महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठ अजमेर संघाचा ९-१ असा सहज पराभव करून अपराजीत राहत अव्वल क्रमांक मिळवला. रविंद्रनाथ टागोर विद्यापीठ भोपाळ संघाने महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठ अजमेर संघाचा ८-१ असा पराभव केला.
भोपाळ संघाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाचा ३-१ असा पराभव करून व्दितीय स्थानासह उपविजेतेपद संपादन केले. या सामन्यात पुणे विद्यापीठ संघाच्या खेळाडूंनी गोल करण्याच्या संधी गमाविल्या. भोपाळच्या उशा पटेल, आशुत्रा कवाडीया आणि कमरप्रीत कौर यांनी गोल नोंदवून सामन्यात विजय संपादन केला.
याआधीच्या साखळी सामन्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाने महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठ अजमेर संघाचा ४-१ असा पराभव करून तिसऱ्या क्रमांकावर आपले नाव निश्चित केला. अखिल भारतीय विद्यापीठ मुलींच्या हॉकी स्पर्धेसाठी आयटीएम विद्यापीठ ग्वाल्हेर, रविंद्रनाथ टागोर विद्यापीठ भोपाळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठ अजमेर हे चार संघ पश्चिम विभागामध्ये अव्वल चार क्रमांक मिळवून पात्र ठरले आहेत.