कळस: इंदापूर तालुक्यातील शेतकरी दुष्काळसदृश परिस्थितीमुळे संकटात सापडला आहे. खरिपातील पिके करपू लागल्याने बँका, सोसायटी यांचे कर्ज कसे फेडायचे, हा मोठा प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
तालुक्यात यंदा सुरुवातीच्या काळात थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला होता. त्यावर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने खरिपाच्या पिकांची लागवड केली. मका, बाजरी, सोयाबीन, सूर्यफूल यांसह विविध पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्यात आली. मात्र, पावसाने दीर्घकाळासाठी दडी मारल्याने तालुक्यातील अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यातूनच शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
सुरुवातीला पाऊस चांगला झाल्याने पिकांना उभारी मिळाली होती. त्यामुळे यंदा चांगले उत्पादन मिळेल आणि मागील आर्थिक अडचणी काही प्रमाणात दूर होतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, पावसाने पाठ फिरवल्याने शेतातील पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. अनेक ठिकाणी पिके करपू लागली आहेत.
शेतकऱ्यांनी पेरणी, बियाणे, खते, औषधे तसेच मशागतीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. त्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी बँका व विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले आहे. आता पिके हातातून जाण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने हे कर्ज फेडायचे कसे? तसेच मुलांचे शिक्षण, घरखर्च, शेतीचा पुढील खर्च आणि कर्जाचे हप्ते यांचा आर्थिक भारही वाढत आहे. शेतीचे उत्पन्नच घटण्याची शक्यता निर्माण झाल्याने कुटुंबाचा आर्थिक गाडा कसा चालवायचा, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
पावसाने आणखी काही दिवस अशीच दडी मारल्यास तालुक्यातील खरीप हंगामावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने दुष्काळसदृश परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा. शेतकऱ्यांना तातडीने दुष्काळी मदत जाहीर करावी, कर्जाच्या परतफेडीबाबत दिलासा द्यावा, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.
इंदापूर तालुक्यात झालेली पेरणी (हेक्टरमध्ये)
बाजरी ३७२.२०
मका १५५५३
सूर्यफूल ८
सोयाबीन ६७