पुणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवारी सकाळी साडे तास वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासांत सरासरी जिल्हा परिषदेसाठी ७.७४टक्के मतदान झाले. भोर तालुक्यात सर्वाधिक मतदान झाले असतानाच दुसरीकडे बारामती तालुक्यातील पणदरे मुढाळे जिल्हा परिषद गट आणि गण मधील ग्रामपंचायत पाहुणेवाडी हद्दीतील वार्ड क्रमांक १ मधील जवळपास 650 मतदार मतदानापासून वंचित राहिले असल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे.
650 मतदार मतदानापासून वंचित राहिल्याने एकूणच निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान याच मतदान केंद्रावर माळेगाव नगरपंचायत निवडणूक वेळी मतदान केलेल्या चव्हाण वस्ती येथील जवळपास २५० मतदारांची नावे पुन्हा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदार यादीत समाविष्ट झाल्याने या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावयाचा का हा प्रश्न उपस्थित होत आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पहाटे काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी राज्यातील सर्व नागरिकांना आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेत मतदान करण्याचे आवाहन केले.
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बजावला मतदानाचा हक्क
इंदापूर: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषद शाळा बोराटेवस्ती, भरणेवाडी येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
दौंडमध्ये आ. राहुल कुल व माजी आ. रमेश थोरात यांनी बजावला मतदानाचा हक्क
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यात आज सकाळी ७.३० वाजता मतदान प्रक्रियेला उत्साहात सुरुवात झाली. लोकशाहीच्या या महत्त्वाच्या पर्वात दौंडचे आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांनी आपला मतदानाचा हक्क बजावून नागरिकांना मतदानाचे आवाहन केले.
दौंडचे आमदार राहुल कुल यांनी पत्नी, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा कांचन कुल यांच्यासह राहू येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. यावेळी मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.