

राजगुरुनगर: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी खेड तालुक्यात शनिवारी (दि ७) सकाळी मतदान सुरू झाले. वाफगाव - रेटवडी गटात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या अधिकृत उमेदवार अश्विनीताई राजेंद्र पाचारणे यांनी सकाळी साडेसात वाजता आपल्या मूळ गाव तिन्हेवाडी येथे मतदान केले.
या गटात तिरंगी लढत असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) या तीन प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्ये लढत आहे. मात्र, अश्विनीताई पाचारणे यांनी प्रचारादरम्यान मतदारांशी घनिष्ठ संपर्क साधला असून, विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळवला आहे.
अश्विनीताई पाचारणे या राजगुरुनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष असून, त्यांचा स्थानिक स्तरावर चांगला प्रभाव आहे. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या समर्थक असलेल्या अश्विनीताईंनी गटातील सर्व गावांमध्ये घराघरांत जाऊन मतदारांना आपलेसे केले आहे. तिन्हेवाडी गावात सकाळीच मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या आणि गावकऱ्यांनी एकमुखाने अश्विनीताईंना पसंती दिल्याचे दिसून आले.
प्रचारात विकास, आरोग्य, शिक्षण, शेतकरी समस्या, महिलांच्या सक्षमीकरण आणि रखडलेल्या रस्त्यांचे काम यांसारख्या मुद्द्यांवर भर देण्यात आला. वाफगाव परिसरात पाणी प्रश्न गंभीर असुन त्यावर कळमोडी प्रकल्पाला गती देऊन उपाययोजना करण्यात येणार असल्याचे अश्विनीताई पाचारणे यांनी ठरवले आहे. अजित पवार गटाच्या मजबूत यंत्रणेमुळे आणि कार्यकर्त्यांच्या निर्णायक फळीमुळे त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
मतदानाच्या दिवशी अश्विनीताईंच्या समर्थकांनी गावोगावी मोठा जल्लोष दाखवला. गटातील अनेक गावांमध्ये त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. समर्थक तथा वाफगावचे माजी सरपंच अजय भागवत, राजेंद्र टाकळकर, गुळाणीचे माजी सरपंच दिलीप ढेरंगे यांनी सांगितले की, "अश्विनीताईंच्या विकासाच्या दृष्टिकोनामुळे आणि जनसेवेच्या वशामुळे आमचा विश्वास त्यांच्यावर आहे. त्यांचे पारडे इतर उमेदवारांपेक्षा जड आहे."
मतदान प्रक्रिया शांततेत सुरू झाली असून, मतमोजणीच्या दिवशी निकाल स्पष्ट होईल. मात्र, वर्तमान चित्र पाहता अश्विनीताई पाचारणे यांच्या विजयाची खात्री समर्थकांमध्ये व्यक्त होत आहे. हा गट विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून, विजयी उमेदवाराला स्थानिक समस्या सोडवण्याची मोठी जबाबदारी असेल.