भटक्या कुत्र्यांच्या सेवेत मग्न असलेल्या पद्मिनी. दुसऱ्या छायाचित्रात आजारी श्वानावर सलाईनद्वारे उपचार करताना. 
पुणे

पुणे : पद्मिनी बनल्या भटक्या श्वानांचा आधार; 16 वर्षांपासून अविरत सेवा

अमृता चौगुले

समीर सय्यद

पुणे : श्वानप्रेम अनेक जण दाखवतात. परंतु, त्यांना अडचणीच्या वेळी मोकाट सोडून दिले जाते, हे खेदजनक आहे. 2006 पासून शहराच्या कानाकोपर्‍यात असलेल्या मोकाट व अपघातग्रस्त श्वानांची मिशन पॉसिबल संस्थेच्या माध्यमातून सेवा सुरू आहे. या संस्थेच्या प्रमुख पद्मिनी स्टॅम्प शहरातील भटक्या व अपघातग्रस्त श्वानांचा आधार बनल्या आहेत.

मिशन पॉसिबल ही संस्था जनावरांसाठी काम करते. शहराच्या कानाकोपर्‍यात श्वानांना मारहाण केली जाते. मोकाट श्वानांना त्रास देणार्‍याविरोधात पोलिसात गुन्हे दाखल केले जातात. मिशन पॉसिबलच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यभरात पाच हजारांपेक्षा अधिक श्वानांना दत्तक दिले आहे. तसेच, दररोज आजारी व अपघातग्रस्त श्वानांवर उपचार केले जातात. ते बरे झाल्यानंतर त्यांना सासवड येथील कॅम्पमध्ये सुरक्षित ठेवले जाते. त्या ठिकाणी अंदाजे एक हजाराहून अधिक श्वानांची देखभाल केली जाते.

'मिशन पॉसिबल' संस्थच्या माध्यमातून काम

पद्मिनी स्टॅम्प यांचा जन्म पुण्यात झाला असून, त्या लग्नानंतर दुबईत स्थायिक झाल्या. परंतु, त्या 2006 मध्ये कायमच्या पुण्यात परतल्या. सध्या पती, मुलगा व मुलगी दुबईमध्येच स्थायिक आहेत. पद्मिनी या नवीन वर्ष नाताळ, वाढदिवस यासाठी दुबईला जात असतात. भवानी पेठ परिसरातील गुरू नानक परिसरातून सुरू केलेली श्वानसेवा आजही कायम आहे. मात्र, त्यांनी 2015 मध्ये मिशन पॉसिबल या सेवाभावी संस्थेची नोंदणी केली. या संस्थेच्या माध्यमातून त्या दररोज शहरातील 600 मोकाट श्वानांना अन्न पुरवितात. त्यासाठी सुमारे 300 किलो तांदूळ शिजवून श्वानांचा शोध घेऊन त्यांना अन्न पुरविले जाते.

कशा वळल्या श्वानसेवेकडे

पद्मिनी ह्या दुबईमध्ये स्थायिक असताना 2006 मध्ये त्यांचा मोठा मुलगा (वय 28) रस्ते अपघातात मृत्युमुखी पडला. त्याच्यावर पुण्यात दफनविधी करण्यात आला. त्याकाळात पद्मिनी ह्या मानसिक तणावात होत्या. त्यावेळी त्या साधू वासवानी यांच्याकडे गेल्या. त्यावेळी वासवानी यांनी 'तू जनावरांची सेवा कर, ते तुला त्रास देणार नाहीत, तर समाधान देतील,' असा सल्ला दिला. त्यानंतर तीन दिवसांनी माझ्या घरासमोर एक श्वान येऊन थांबला, त्यानंतर तो दुसर्‍या मुलाच्या मागे घरात आला. त्यावेळी पद्मिनी यांना वासवानी यांचे शब्द आठवले. तेव्हांपासून अविरतपणे त्या श्वानांची सेवा करत आहेत.

शहरात अ‍ॅनिमल वेल्फेअरची संख्या वाढली असून, अनेकजण आपापल्या पद्धतीने श्वान, मांजरी यांची सेवा करत आहेत. माझ्याकडे जागा अपुरी पडत होती. त्यावेळी मी माझ्या घरातील सर्व भाडेकरूंना घर रिकामे करायला लावले. त्याठिकाणी श्वान ठेवायला सुरुवात केली. दरम्यान, अ‍ॅॅड. अमरसिंह जाधवराव यांनी सासवड येथे दोन एकर जागा भाडेतत्त्वावर दिली. त्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणात श्वानांची सेवा करत आहोत. श्वानांची सेवा करण्यासाठी बिहार आणि उत्तर प्रदेशातून कामगार बोलवावे लागले. सुरुवातीला अनेकांचा विरोध पत्करावा लागला, परंतु आता तो मावळला आहे.
                                                                    – पद्मिनी स्टॅम्प, मिशन पॉसिबल, पुणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT