सुनील माळी
पुणे: केवळ महाराष्ट्रजनांपुढेच नव्हे, तर संपूर्ण जगापुढेच रयतेचे राज्य कसे असते, याचा आदर्श उभा करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्फूर्तिदायी चरित्राची मांडणी करण्याचे काम पुणे महापालिकेने सुमारे दहा वर्षांपूर्वी सुरू केले, पण आपल्या फक्त आरंभशूरतेसाठीच प्रसिद्ध असलेल्या महापालिकेने त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले... त्याचा परिणाम...? हे स्मारक आज अपूर्ण आहे आणि केवळ अपूर्णच नव्हे, तर मराठीजनांच्या गळ्यातला ताईत असलेल्या शिवरायांची शिल्पे कचऱ्यात आणि उकिरड्यात उभी असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
आजची स्थिती
दै. ‘पुढारी’च्या प्रतिनिधीने पेशवे उद्यानातील या अपूर्ण शिवसृष्टीस आज भेट दिली असता तेथील अवस्था केवळ धक्कादायकच नव्हे, तर संतापजनक असल्याचे आढळून आले. महाराजांची ही शिल्पे आज कचऱ्याच्या ढिगात आहेत. बांधकामाचा राडारोडा, उद्यानातील झाडांची वाळलेली पाने, धूळ आणि अस्वच्छता यांमध्ये आज अखिल महाराष्ट्राचे आराध्यदैवत असल्याचे पाहून कुणाच्याही मनात संतापाशिवाय दुसरी भावना येणार नाही.
दारावरच प्रवेश बंद पाटी
सुमारे एक कोटी रुपये खर्च केलेल्या या शिवसृष्टीच्या दारावरच महापालिकेने पाटी काय लावली आहे? तर प्रवेश बंद. पाटीमागे एक आडवा बांबूही बांधलेला आहे. घाणीत ठेवलेल्या या शिवशिल्पाची परिस्थिती पुणेकरांना समजू नये, यासाठी हा प्रवेश बंद केला का काय? असा प्रश्न ती पाटी पाहून मनात येतो.
2017 मध्ये पेशवे उद्यानात शिवसृष्टीचे काम सुरू करण्यात आले होते. एकूण 28 शिल्पचित्र उभारण्यात येणार आहेत. या शिल्पचित्रात शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील विविध प्रसंग दाखवले जाणार आहेत. आत्तापर्यंत यासाठी 85 लाखांचा खर्च आला. कोरोनामुळे हे काम रखडले. आता उरलेल्या शिल्पचित्रांचे काम करण्यासाठी 84 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. हे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढच्या आर्थिक वर्षात पुढील राहिलेल्या शिल्पचित्रांसाठी तरतुदीची मागणी करणार असून, त्यानंतर या शिवसृष्टीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.डॉ. अशोक घोरपडे, उद्यान विभागप्रमुख, महापालिका
नगरसेवकपदाच्या माझ्या मुदतीत मी आग््राहाने शिवसृष्टीची योजना मांडली. मात्र, ते काम जवळपास पूर्णत्वाला गेले असतानाच नगरसेवकपदाची माझी मुदत संपली. त्यामुळे उरलेले काम पुढे रेटण्याचा पाठपुरावा मला करता आला नाही.अशोक हरणावळ, माजी नगरसेवक