पुणे

Pune Ganeshotsav 2023 : पुणे फेस्टिव्हलचे दिमाखात उद्घाटन

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी देणार्‍या 35 व्या पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ चित्रपट व नृत्य कलाकार खासदार हेमामालिनी यांच्यासह अनेक मराठी कलाकारांची त्यांचे कार्यक्रम सादर करीत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. राज्याचे पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते फेस्टिव्हलचे शुक्रवारी (दि. 22) उदघाटन झाले.

पुणे फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कलमाडी, पालकमंत्री चंद्रकात पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार रजनी पाटील, श्रीरंग बारणे, आमदार रवींद्र धंगेकर, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ अस्थिशल्य विशारद पद्मविभूषण डॉ. के. एच संचेती यांना 'जीवन गौरव' पुरस्कार, तसेच संजय घोडावत ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष संजय घोडावत यांना 'पुणे फेस्टिव्हल' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यंदा शताब्दी साजरी करणार्‍या गणेश खडक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्री त्रिशुंड गणपती विजय मंडळ ट्रस्ट, सदाशिवपेठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांचाही सन्मान करण्यात आला. सनईवादन आणि शंखनाद झाल्यानंतर हेमामालिनी आणि त्यांच्या पथकाने सादर केलेल्या गणेश वंदनेला रसिकांनी उत्फूर्त दाद दिली. नंदिनी राव गुजर यांनी गणेश स्तृती सादर केली. नृत्यसीता, विठ्ठल-विठ्ठल गजर, आजादी का अमृत महोत्सव, कलात्मक योग आदी कार्यक्रमांचे सादरीकरण झाले.

भारतातील ऐतिहासिक साम—ाज्ये यांवर आधारित गाण्याचे सादरीकरण शर्वरी जमेनीस व त्यांच्या पथकाने सादर केले. 'लावणी फ्युजन' या कार्यक्रमात मराठी कलाकार भाग्यश्री चिरमुले, संस्कृती बालगुडे, तेजस्विनी लोणारी, अमृता धोंगडे, आयली घिया, रुतुजा जुन्नरकर यांच्यासह पायल वृंद डान्स अ‍ॅॅकॅडमीच्या कलाकारांनी भाग घेतला. कलमाडी यांनी स्वागतपर भाषण केले. महाजन, पाटील, आणि पटोले यांची भाषणे झाली. संचेती आणि घोडावत यांनी सत्काराला उत्तर दिले.

सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद

हेमामालिनी यांच्या चित्रपटांतील गाजलेल्या गाण्यांपैकी काही गाणी नृत्यातून सादर करीत मराठी कलाकारांनी 'गोल्डन इरा ऑफ ड्रीम गर्ल' हा कार्यक्रम त्यांच्यासमोरच सादर केला. हेमामालिनी या पुणे फेस्टिव्हलच्या पेट्रन असून, गेली तीस वर्षे फेस्टिव्हलमध्ये कार्यक्रम सादर करीत आहेत. त्यांच्या गाजलेल्या गाण्यांच्या त्यांच्यासमोरच झालेल्या सादरीकरणाला त्यांनी दाद दिली.

अनेकदा त्या भावूक झाल्या. कलाकारांचे सादरीकरण, तसेच हेमामालिनी यांना तेथील पडद्यावर पाहताना रसिक भारावून गेले होते. कलाकारांचे कौतुक करण्यासाठी हेमामालिनी व्यासपीठावर गेल्या, तेव्हा प्रेक्षकांनी सभागृहात उभे राहून त्यांना गौरविले. मराठी कलाकार उर्मिला कानिटकर, स्मिता शेवाळे, नुपूर दैठणकर, मयुरेश पेम आदींनी या कार्यक्रमात भाग घेतला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT