चंद्रावर अनुमानापेक्षा कमीच आहे पाणी! | पुढारी

चंद्रावर अनुमानापेक्षा कमीच आहे पाणी!

वॉशिंग्टन : भारताच्या ‘चांद्रयान-1’ मध्येच चंद्रावर पाण्याचे अस्तित्व असल्याचे सर्वप्रथम समजले होते. त्यानंतर चंद्रावर किती प्रमाणात बर्फ व त्या स्वरूपात पाणी असू शकते याचे वेगवेगळे अनुमान लावले जात होते. आता अमेरिकन संशोधकांनी म्हटले आहे की चंद्रावर अनुमानापेक्षा कमी प्रमाणातच पाणी आहे!

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असे अनेक क्रेटर किंवा खड्डे आहेत ज्यांच्यामध्ये कधीही सूर्यप्रकाश पोहोचत नाही. आतापर्यंतच्या डेटानुसार या खड्ड्यांमध्ये पाण्याचे अस्तित्व असू शकते जे बर्फाच्या रूपात आहे. मात्र, एका नव्या संशोधनानुसार यामध्ये आधीच्या अनुमानापेक्षा कमीच पाणी असू शकते. या भागाला स्थायी रूपाने छाया असलेले क्षेत्र (पीएसआर) म्हटले जाते. चंद्रावरील याच क्रेटर्सजवळ भविष्यातील अनेक अंतराळयाने उतरतील. अन्य खगोलांच्या धडकेमुळे चंद्राच्या पृष्ठभागावर असे विशाल खड्डे निर्माण झालेले आहेत. त्यांच्यामध्ये बर्फ असल्याचे मानले जात असल्यानेच त्यांच्याजवळ ही अंतराळयाने उतरवली जातील. या बर्फाचा व पाण्याचा वापर भविष्यातील मोहिमांवेळी होऊ शकतो.

पिण्याबरोबरच रॉकेटसाठी इंधन बनवण्याच्या कामीही त्याचा वापर होऊ शकतो. त्यासाठी पाण्यातील हायड्रोजन व ऑक्सिजन वेगळे केले जाईल. जर त्यामध्ये यश आले तर चंद्रावरून पुढे मंगळाकडे जाण्यासाठीची मोहीम सुकर होऊ शकेल. संशोधनातून दिसून आले आहे की ‘पीएसआर’ हे जास्तीत जास्त 3.4 अब्ज वर्षांपूर्वीचे आहेत. ज्या विशाल खड्ड्यांमध्ये ते आहेत असे खड्डे 4 अब्ज वर्षांपूर्वीचे आहेत. नव्या मॉडेलनुसार अशा ठिकाणी पाण्याचे जितके प्रमाण असेल असे आधी वाटत होते त्यापेक्षा ते कमीच असू शकते. अ‍ॅरिझोनामधील प्लॅनेटरी सायन्स इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ वैज्ञानिक नॉर्बर्ट शॉर्गोफर यांनी याबाबतची माहिती दिली.

Back to top button