पुणे

पुणे : टिंगरेनगर-संजयपार्क भागात टिंगरे बंधुंमध्ये संघर्ष होणार की टळणार?

अमृता चौगुले

उदय पोवार

येरवडा : राष्ट्रवादीच्या आमदारांचे बंधू या प्रभागातून लढणार असल्याने सत्ताधारी भाजपसाठी या प्रभागात मोठे आव्हान असणार आहे. सद्य:स्थितीला दोन्ही पक्षांनी संभाव्य उमेदवारांची नावे गुलदस्तात ठेवली आहेत. राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जरी खरी लढत होणार असली, तरी यामध्ये पारंपरिक टिंगरेबंधूंमध्ये संघर्ष होणार की टळणार, याची चर्चा रंगू लागली आहे.

आताचा प्रभाग एक, दोन, तीन मिळून प्रभाग दोन (टिंगरेनगर-संजय पार्क) हा नवीन प्रभाग तयार झाला आहे. आमदारांनी बंधूंसाठी सर्वांत 'सेफ' आणि आरक्षण नसणारा प्रभाग तयार केला असल्याची चर्चा आहे. प्रभाग एकमधील मुंजाबावस्ती, श्रमिक वसाहतीचा काही भाग यामध्ये सुमारे सात हजार मतदारांचा भाग आला आहे, नवीन प्रभाग 2 मध्ये विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचा सध्या नगरसेवक असलेला सर्वाधिक परिसर आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी हा प्रभाग सुरक्षित मानला जात आहे.

राष्ट्रवादीकडून आमदारांचे बंधू सुहास टिंगरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र, अन्य दोन उमेदवार कोण, हे गुलदस्तात आहे. भाजप, सेना आणि काँग्रेस या तीन पक्षांतील इच्छुक राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळावी, यासाठी गळ टाकून आहेत. मात्र, आरक्षण सोडत झाल्यानंतरच आपले पत्ते उघड करण्याचा पवित्रा आमदार टिंगरे यांनी घेतला आहे. राष्ट्रवादीच्या अन्य इच्छुकांमध्ये रेणुका चलवादी, विनोद पवार, सुरेखा विश्वास खांदवे, सोहनसिंग सोना यांची नावे चर्चेत आहेत.

भाजपचे मतदार आहेत पण उमेदवार आयात करावा लागणार

जुन्या तीन प्रभागांत भाजपचे नगरसेवक जास्त असल्याने भाजपचे मतदार अधिक आहेत. मात्र, भाजपला दुसर्‍या प्रभागातील उमेदवारावर अवलंबून राहावे लागणार आहे. नगरसेवक अनिल टिंगरे हेदेखील प्रभाग 2 मधून आपला दावा सांगत आहेत. त्यांचा जुना सन 2012 चा प्रभाग यामध्ये आल्याचे सांगत आरक्षणानंतर आपली भूमिका जाहीर करणार आहेत. सध्याचा प्रभाग 3 मधील विमाननगरचा काही भाग नवीन 2 प्रभागाला जोडला आहे. मात्र, भाजपच्या नगरसेविका मुक्ता जगताप, अर्जुन जगताप आपला दावा सांगत आहेत. याशिवाय रमेश आढाव, श्यामा जाधव, चंद्रकांत जंजिरे, विशाल टिंगरे, विजय चौगुले तसेच रिपाइंच्या विद्यमान नगरसेविका फरझाना शेख व आयुब शेख हे केवळ नवीन प्रभाग 2 मधून लढण्यास इच्छुक आहेत.

एकंदरीत, या प्रभागामधून राष्ट्रवादीमधून टिंगरे आणि भाजपमधून देखील टिंगरे आल्यास पारंपरिक लढत पुन्हा एकदा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना, काँग्रेस यांची ताकद या प्रभागात फारशी नसल्याने राष्ट्रवादी आणि भाजप-आरपीआयमध्येच खरी लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेनेकडून सागर माळकर, काँग्रेसकडून राजेंद्र शिरसाट, अल्तमश मोमीन, राहुल लव्हे, मनसेकडून श्याम ताठे, बसपकडून हुलगेश चलवादी, एमआयएमकडून शब्बीर शेख यांची नावे चर्चेत आहेत.

अशी आहे प्रभागरचना

येरवडा जेल वसाहत, प्रेस कॉलनी,
कस्तुरबा सोसायटी पार्ट, टिंगरेनगर, एकतानगर, बर्मासेल, कलवड पार्ट, खेसे पार्क पार्ट, मुंजाबावस्ती पार्ट, रोहन मितीला, म्हाडा कॉलनी, सिम्बायोसिस कॉलेज परिसर, विमाननगर पार्ट, नगर रोड क्षेत्रीय कार्यालय, संजय पार्क.

  • एकूण लोकसंख्या : 56,969
  • अनुसूचित जाती : 7,269
  • अनुसूचित जमाती : 872

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT