पुणे

शरद पवारांच्या उपस्थितीत पुणे मेट्रोची चाचणी म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या : चंद्रकांत पाटील

backup backup

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मेट्रोची चाचणी घेऊन जणू काही त्यांच्यामुळेi पुणे मेट्रो चा प्रकल्प झाल्याचे प्रशासनाने भासविणे म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या असा प्रकार आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. पुणे व पिंपरी चिंचवडमधील लोकप्रतिनिधींना डावलून केवळ राज्यसभा सदस्य असलेल्या एका नेत्याच्या उपस्थितीत चाचणी घेतल्याबद्दल मेट्रोच्या प्रशासनाविरोधात आपण विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार आहे, असा इशाराही त्‍यांनी यावेळी दिला. ते मुंबईत भाजपा प्रदेश मुख्यालयात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह आणि प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले , शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राज्यात १५ वर्षे आणि देशात दहा वर्षे सरकार असताना हा प्रकल्प रखडला होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाच्या सर्व परवानग्या मिळवून काम सुरू करण्यात आले. पुणे मेट्रो हा अकरा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. त्यामध्ये थेट सहभाग आणि कर्जाला हमी असा केंद्र सरकारचा आठ हजार कोटी रुपयांचा वाटा आहे.

राज्य शासन आणि पुणे महानगरपालिकेचा मिळून तीन हजार कोटींचा हिस्सा आहे. पुणे मेट्रोच्या एका टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे ठरले होते पण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. अशा स्थितीत शरद पवारांच्या उपस्थितीत आज मेट्रो ची चाचणी करणे व त्यांच्यामुळे प्रकल्प झाल्याचे भासविणे हा आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा प्रकार आहे. तेमेट्रोची चाचणी करायची होती तर त्यासाठी केवळ शरद पवार यांना का निमंत्रित केले असा आपला मेट्रो प्रशासनाला सवाल आहे, असेही चंद्रकांत पाटील म्‍हणाले.

पुण्यात आठ विधानसभा सदस्य आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये तीन विधानसभा सदस्य आहेत. पुण्याचे खासदार गिरीश बापट आहेत. माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा सदस्य प्रकाश जावडेकर हे पुण्याचे निवासी आहेत. मेट्रो प्रशासनाला उद्घाटनपर धाव घ्यायची होती तर त्यांनी या सर्व लोकप्रतिनिधींना तसेच पुण्याच्या महापौरांना सन्मानाने सहभागी करायला होते. त्यांनी केवळ एका नेत्याला श्रेय देण्याचा का प्रयत्न केला, असा आपला सवाल आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

उत्पल पर्रिकर यांना बिनविरोध विजयी करण्याची हमी शिवसेना देणार का?

शिवसेना खासदार संजय राऊत गोवा विधानसभेच्या विषयावरून बरीच वक्तव्ये करतात. दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांच्या मुलाला उमेदवारी देण्यावरूनही ते टीका टिप्पणी करत आहेत. उत्पल पर्रिकर यांना भाजपाने उमेदवारी दिली तर त्यांना बिनविरोध विजयी करण्याची हमी शिवसेना आणि इतर पक्ष देणार का, असा सवाल त्यांनी केला.

अमरावतीमध्ये महापालिका आयुक्तांनी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष आदी लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेताच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हलविला. आयुक्तांच्या विरोधातील आंदोलनात सहभागी होण्याची सूचना आपण भाजपाच्या स्थानिक लोकप्रतिनिधींना केली आहे, असे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारच्या प्रशासनाने पोलीस बंदोबस्त लाऊन अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हलविला. पण रझा अकादमीने मोर्चा काढला त्यावेळी त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त लावला नाही. अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्याचे शिवसेनेचे काँग्रेस राष्ट्रवादीप्रमाणे धोरण आहे का, असाही सवालही चंद्रकांत पाटील यांनी केला.

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT