पुणे

पुणे : ‘वेंकीज’च्या नावाने 12 कोटींची फसवणूक

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुण्यातील वेंकीज इंडिया या कंपनीच्या नावाचा वापर करून नागरिकांची 12 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

कंपनीची वेबसाईट, लोगो व मालकाच्या फोटोचा वापर करून बनावट वेबसाईट व यू ट्यूब चॅनेल सुरू केले. त्याद्वारे नागरिकांना ऑनलाईन गुंतवणूक करण्यास भाग पाडून ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी कंपनीच्या वतीने रोहन अजय भागवत (वय 32, रा. रास्ता पेठ) यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी मोहंमद मोशाफी वाहिद, संतोष यादव, प्रेम बिहारीलाल साहू, रंजन गुरुचरण प्रसाद कुमार, पर्जा टेक यू ट्यूब चॅनेलधारक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 13 ते 24 जानेवारी 2022 दरम्यान ऑनलाईन घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेंकीज इंडिया ही कुक्कुटपालन क्षेत्रात काम करणारी भारतातील एक नामवंत कंपनी आहे. कंपनीच्या वेंकीजफार्म डॉट नेट या नावाने बनावट वेबसाईट व यू ट्यूब चॅनेल सुरू करण्यात आले. त्यात वेंकीजचे नाव, लोगो व मालकाचा फोटो वापरून लोकांना या कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. वेंकीज फार्ममध्ये गुंतवणूक केल्यास त्या गुंतवणुकीचा मोबदला म्हणून तुमच्या बँक खात्यात ठराविक रक्कम दर आठवड्याला ट्रान्सफर करण्यात येईल, असे आमिष दाखविण्यात आले.

पैसे गुंतवणुकीचे कंपनीचेच आवाहन आहे, असे वाटल्याने पुणे व इतर राज्यातील नागरिकांनी तेथे दिलेल्या वॉलेटवर पैसे भरले. त्यानंतर त्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर न झाल्याने त्यांनी चौकशी करण्यास सुरुवात केली. तेव्हा आपल्या कंपनीच्या नावावर फसवणूक केली जात असल्याचे कंपनीला समजले. कंपनीच्या आयटी विभागाने केलेल्या प्राथमिक चौकशीत 12 कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. नागरिकांचे पैसे आपल्या खात्यावर ऑनलाईन घेऊन गुंतवणूक करणार्‍या नागरिकांची फसवणूक केली आहे. तसेच यू ट्यूब चॅनेलवर कंपनीची जाहिरात करून कंपनीच्या नावावर नागरिकांना पैसे भरावयास लावून कंपनीची जनमानसात प्रतिमा मलीन करण्यात आली. हा प्रकार समोर आल्यानंतर कंपनीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक विजय खोमणे अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT