पुणे

लग्नसोहळ्यात चोरी करणारे परप्रांतीय जेरबंद : दौंड पोलिसांची कामगिरी;

Laxman Dhenge

दौंड : पुढारी वृत्तसेवा : दौंड शहर व आजूबाजूच्या मंगल कार्यालयात गर्दीचा फायदा घेऊन विवाह सोहळ्यात नवरीचे दागिने, रोख रक्कम, पैशांची पाकिटे, साहित्यावर डल्ला मारणार्‍या तीन परप्रांतीयांना दौंड पोलिसांनी जेरबंद केले. यामध्ये एका महिलेचा समावेश असून आणखी दोघे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळवारी (दि. 27) काष्टी रस्त्यालगत पवार पॅलेस येथे एक विवाहसोहळा सुरू असताना नीलेश पवार (रा. सोनवडी, ता. दौंड) यांना काही संशयित हे गर्दीचा फायदा घेऊन चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याबाबत लक्षात आले.

त्यांनी तत्काळ दौंड पोलिसांना माहिती कळविली. दौंड पोलिसांनी तत्काळ पवार पॅलेस गाठले आणि कार्यालयातील नीलेश पवार आणि नागरिकांच्या मदतीने दोघे आणि एका महिलेला ताब्यात घेतले. त्यांची नावे राज रामनारायण सिसोदिया (वय 27), बलभीम माकड सिसोदिया (वय. 19) आणि शब्बोबाई प्रतापसिंग सिसोदिया (वय 50, सर्व रा. गुलखेड, ता. राजगड मध्यप्रदेश) अशी आहेत.
पोलिसांनी या दोघांची झडती घेतली असता त्यांनी चोरी केलेले पाकीट, त्यामध्ये 6 हजार 500 रूपये हे रामनारायण सिसोदिया याच्याजवळ मिळून आले.

पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्यांनी "आमच्यासोबत राहुल रामनारायण सिसोदिया व दिनेशराजे सिसोदिया (रा. रायगड, मध्य प्रदेश) हे देखील असल्याचे सांगितले. या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. दौंडचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलिस निरीक्षक अरविंद गटकुळ, पोलिस अंमलदार सुभाष राऊत, नितीन बोराडे, विजय पवार, विशाल जावळे, आदेश राऊत, अमोल देवकाते, सुरेश चौधरी, रवी काळे, अशोक जाधव आदींनी ही कारवाई केली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT