कवठे येमाईतून रोहित्रांची चोरी : शेतकरी वर्ग पुरता हैराण | पुढारी

कवठे येमाईतून रोहित्रांची चोरी : शेतकरी वर्ग पुरता हैराण

टाकळी हाजी : पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील बेट भागात चोरट्यांनी रोहित्र चोरीचा सपाटा लावला आहे. मंगळवारी (दि. 27) पहाटेच्या सुमारास कवठे येमाई येथील फत्तेश्वर बंधार्‍याजवळील दोन रोहित्र फोडून त्यातील तांब्याच्या तारा काढून नेल्याची घटना उघडकीस आली. वारंवार होणार्‍या या घटनांमुळे शेतकरी वर्ग पुरता हैराण झाला आहे.

रोहित्र चोरीच्या घटनांमुळे गावचा पाणीपुरवठा तसेच शेतकर्‍यांच्या शेतीचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. विहिरींनी तळ गाठला असून नदीवरील पाणीसुद्धा वापरता येत नाही. शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बेट भागात विद्युत रोहित्र, केबल, पंप चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. शिरूर पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.
विद्युत रोहित्र चोरीला जाऊ नये म्हणून महावितरणकडून रोहित्र वेल्डिंग करण्यात येत आहे. परंतु चोरटे वेल्डिंग तोडून रोहित्र चोरून नेत असल्याने शेतकर्‍यांची डोकेदुखी वाढलेली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

रोहित्र चोरीच्या या घटनेमुळे गावाला तीन-चार दिवस पाणी येणार नाही. त्यामुळे गावकर्‍यांमध्ये असंतोष पसरला आहे. शिरूर पोलिस यंत्रणेने अशा चोरीच्या घटनांचा लवकर तपास लावावा. याबाबत पोलिस प्रशासनाशी लवकर चर्चा करणार आहे.

– शोभा किसन हिलाळ, सरपंच, कवठे येमाई

मी तीन एकर शेतीमध्ये कलिंगड पीक घेतलेले आहे, यासाठी तीन लाखांचा खर्च झाला आहे. पण आता पाण्याविना पीक वाया जाण्याची भीती आहे. रोहित्र चोरीमुळे कलिंगडाच्या पिकाला पाणी कसे द्यायचे हा प्रश्न सतत भेडसावत आहे.

– संतोष जमादार घोडे, शेतकरी, कवठे येमाई

हेही वाचा

Back to top button