पुणे: हवामानातील बदलांसह महासागराकडून येणाऱ्या वादळांची वर्दी आता ‘एआय’च्या साहाय्याने हवामान विभाग देणार आहे. हे अंदाज अचूक अन् वेगवान मिळावेत, यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (आयआयटीएम) पुणे या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या संस्थेने इटली या देशासोबत नुकताच सामंजस्य करार केला आहे.
हवामान संशोधनात अग््रागण्य समजली जाणारी इटली देशातील सीएमसीसी (युरो-मेडिटेरियन सेंटर ऑन क्लायमेट चेंज) आणि आयआयटीएम पुणे या दोन संस्थांत हा करार 26 जानेवारी 2026 रोजी झाला. एआय वापरून हवामान मॉडेलिंगला चालना देण्यासाठी दोन देशांत संशोधनात्मक कार्याला गती यावी, हा सामंजस्य कराराचा (एमओयू) उद्देश असल्याचे आयआयटीएमच्या शास्त्रज्ञांनी सांगितले.
इटलीचे शास्त्रज्ञ आले पुण्यात...
या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी अनेक बैठका झाल्या. यात 26 जानेवारी 2026 रोजीच्या बैठकीला सीएमसीसीचे अध्यक्ष अँटोनियो नवरा, आयआयटीएम पुणेचे संचालक डॉ. सूर्यचंद्र राव, शास्त्रज्ञ डॉ. स्वप्ना पानिकल, डॉ. सुवर्णा फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. हा सामंजस्य करार दोन्ही देशांच्या संशोधन संस्थांमध्ये देवाणघेवाण आणि संवादासाठीच्या उपक्रमांचा समावेश असलेल्या भागीदारीला औपचारिक स्वरूप देण्यासाठी करण्यात आल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.
कराराचा घटनाक्रम...
फेबुवारी 2025 मध्ये भारत आणि इटलीचे अग््रागण्य शास्त्रज्ञ ’हवामान आणि महासागर विज्ञानातील मशिन लर्निंग ॲप्लिकेशन्स’ या विषयावरील संयुक्त कार्यशाळेसाठी पुण्यात भेटले.
या कार्यशाळेचा उद्देश प्रगत हवामान मॉडेलिंगच्या क्षेत्रात एआयच्या वापराशी संबंधित संधी शोधणे, अंदाज वर्तविण्याची क्षमता सुधारणे आणि हवामानातील नावीन्यपूर्ण उपाय विकसित करणे हा होता.
या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेने इटली आणि भारत यांच्यात आंतरविद्याशाखीय संशोधनाला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
काय होणार फायदा..?
या करारामुळे अचूक अन् वेगवान पद्धतीने हवामानासाठी अंदाज वर्तविण्याची क्षमता वाढेल.
नावीन्यपूर्ण दृष्टिकोन विकसित होतील. करार भविष्यातील इटली-भारत सहकार्यासाठी मार्ग मोकळा करेल.
संयुक्त कार्यगट स्थापन करणे आणि हवामान विज्ञानात एमएलच्या भूमिकेवर श्वेतपत्रिका तयार करणे यांचा समावेश आहे.
एआय वापरून हवामान मॉडेलिंग, संशोधनाला चालना देण्यासाठी, अंदाज वर्तविण्याची क्षमता वाढविण्यासाठी उपयोग.
हवामानात नावीन्यपूर्ण उपाय विकसित करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण ठरेल.