पुणे

मला घरच्यांची आठवण येतेय! युक्रेनमध्ये अडकलेल्या वरदला पुण्याची ओढ

अविनाश सुतार

पुणे : प्रसाद जगताप;  मला घरच्यांची खूप आठवण येतेय… जसजसा दिवस उजाडेल तसतसे येथील वातावरण खूपच भितीदायक बनत चालले आहे. घराबाहेर पडणे तर सोडाच! पण घरात बसून सुध्दा कधी काय होईल सांगता येत नाही, आम्ही हॉस्टेलच्या बेसमेंटमध्ये राहत असून, लवकरात लवकर केंद्र सरकारने आम्हाला येथून बाहेर काढावे, असे युक्रेनमध्ये अडकलेला विद्यार्थी वरद कोंढरे याने दै. 'पुढारी'च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

पुण्यातील बालाजीनगर येथील रहिवासी मनोज कोंढरे यांचा मुलगा वरद. गेल्या तीन महिन्यापूर्वीच वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेन येथील चरणीवित्सी शहरातील बुकोव्हिनिया युनिव्हर्सिटीमध्ये गेला आहे. मात्र, अचानक रशिया आणि युक्रेनमधील उद्भवलेल्या युध्दामुळे तो तेथेच अडकून पडला आहे. त्या पार्श्वभूमीवर दै.'पुढारी'च्या वतीने 'वरद'शी संवाद साधून त्याची विचारपूस करून त्याला आलेल्या संकटाशी सामना करण्यासाठी धीर देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

वरद म्हणाला, आम्ही इंडियन स्टुडंट सोसायटीच्या माध्यमातून युक्रेनमध्ये शिक्षणासाठी आलो आहे. तीन महिनेच झाले असून, पहिल्या वर्षाचे शिक्षण सुरू आहे. आता मी युक्रेनमधील चरणीवित्सी शहरात आहे, येथे हल्ल्याचे पडसाद जाणवत आहे. बॉम्ब हल्ल्यासह सायबर हल्लेदेखील आम्ही पाहिले. सध्या आमच्याकडे मोबाईल, इंटरनेट, लाईट, पाणी सुविधा आहे. अन्नसाठा आहे, पण उद्या असेल की नाही सांगता येत नाही. आतापर्यंत येथील हार्कीव्ह, कीव, ओदिसा, क्रेमिया या शहरांचा रशियाने पुर्णत: काया पालट केला आहे. आता रशियाचे सैन्य युक्रेनमध्ये सर्वत्र ताबा मिळविण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आम्हाला आता जीवाची खूपच भीती वाटत आहे. आम्ही रोमेनियातून बाहेर पडण्याचे नियोजन करत आहे. आम्हाला सर्व साहित्याच्या बॅगा भरून सज्ज राहण्याचे स्थानिक प्रशासनाचे आदेश आहेत.

माझ्या मुलाला परत भारतात आणा, वरदच्या वडिलांची आर्त हाक…

शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेला 'आमचा वरद' युक्रेनमध्ये अडकून पडला आहे. युक्रेनची एकंदरीत स्थिती पहाता आम्हाला खूपच भीती वाटत असून, संपूर्ण कुटुंबच चिंताग्रस्त आहे. त्यामुळे केंद्र सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या आमच्या मुलाला तत्काळ भारतात आणावे. अशी आर्त हाक 'वरद'च्या वडिलांनी दिली आहे. वरदचे वडील मनोज कोंढरे दै.'पुढारी'शी बोलताना म्हणाले, युक्रेनमध्ये अडकलेल्या आमच्या मुलाशी संपर्क झाला आहे. वरद आणि त्यांच्या मित्रांचे युक्रेनमधून बाहेर पडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तेथील मुख्य विमानतळावर झालेल्या बॉम्ब हल्ल्यामुळे त्यांना परतता आलेले नाही. अनेकदा बाहेर पडण्याचे प्रयत्न करण्यात आले. परंतु, घराबाहेर असलेल्या युध्दाची स्थितीमुळे तळघरातच दबा धरून राहावे लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आमच्या मुलाला परत आणावे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT