रशिया – युक्रेन युद्धाचा भडका : जगाला भासणार पॅलेडियमचा तुटवडा | पुढारी

रशिया - युक्रेन युद्धाचा भडका : जगाला भासणार पॅलेडियमचा तुटवडा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : रशिया-युक्रेन ( russia – ukraine war ) युद्धाचा परिणाम जगभरासह भारतावर होऊ लागला आहे. कच्च्या तेलाच्या किमती गगनाना भिडू लागल्या आहेत. त्याचा परिणाम भारतात सध्या दिसत नसला, तरी पुढील महिन्यात तो दिसू शकतो. शिवाय, पॅलेडियमच्या किमतीतही वेगाने वाढ होऊ लागली आहे. पॅलेडियमचे सर्वाधिक उत्पादन रशियात होते. त्याचा वापर पेट्रोल आणि हायब्रीड गाड्यांच्या एक्झॉस्ट, स्मार्टफोन, इलेक्ट्रिक उत्पादने, दंतचिकित्सा आणि दागदागिन्यांमध्ये केला जातो. त्यामुळे या सर्व वस्तूंच्या किमतींवर परिणाम होणार आहे.

काय आहे पॅलेडियम? ( russia – ukraine war )

पॅलेडियम हा एक चकाकणारा पांढरा धातू आहे. प्लॅटिनम, रुथेनियम, रोडियम, ओस्मियम, इरिडियम या ग्रुपचाच हा धातू एक भाग आहे. रशिया आणि दक्षिण आफ्रिकेत हा धातू मोठ्या प्रमाणावर आढळतो. याचे प्रमाण कमी असल्यानेच मागणी आणि पुरवठ्यात मोठा फरक पडतो. त्यामुळेच जगातील मौल्यवान धातूंमध्ये याचा समावेश होतो. त्याची किंमत सोने आणि प्लॅटिनमपेक्षाही जास्त आहे.

सोन्यापेक्षा महागडा धातू ( russia – ukraine war )

पॅलेडियमच्या एका ग्रॅमची किंमत 6,188 रुपये आहे. तर प्रतिदहा ग्रॅमची किंमत 72 हजार 184 रुपये आहे. सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 51 हजारांच्या आसपास आहे. तर प्लॅटिनमची प्रति 10 ग्रॅमची किंमत 35 हजारांच्या आसपास आहे. पॅलेडियमपासून बनवलेले दागिनेही महागडे आहेत. 4 ग्रॅम चोख पॅलेडियम रिंगची किंमत 1 लाख 69 हजार रुपये इतकी आहे.

…यासाठी होतो वापर 

पेट्रोल कार, घातक वायूंचे रूपांतर द्रवात करण्यासाठीही याचा वापर होतो, एका स्मार्टफोनमध्ये 0.015 ग्रॅम पॅलेडियम वापरले जाते. मायक्रोप्रोसेसर आणि प्रिंटेड सर्किट बोर्डस्मध्ये पॅलेडिमयचा वापर होतो. दंतचिकित्सेत ‘ड्रिल अँड फिल’ उपचारात याचा वापर होतो.

Back to top button