पुणे

‘हॉटेल वैशाली’ : इथं जुळली अनेक पिढ्यांतील लग्ने!

अमृता चौगुले

दिलीप कुंभोजकर

जून 1968…दिनांक लक्षात नाही; पण फर्ग्युसन कॉलेजचा पहिला दिवस! अ‍ॅडव्होकेट विजय सावंत, प्रकाश जोशी, शेखर महाजन….आणि मी. गप्पा मारता मारता चार तासानंतर गेलो…मद्रास हेल्थ होममध्ये! काही महिन्यातच एमएचएचचे हॉटेल वैशालीचे रूपांतर झाले !
प्रत्येकाच्या खिशातल्या पैशांचा … सुट्या नाण्यांचा अंदाज घेत निदान सिंगल वडा..इडली तरी खाता येईल इतके पैसे जमले की जात असू 'हॉटेल वैशाली'त.

पण आवडायचा 'मसाला डोसा' ! पैसे गोळा करीत खाल्लेल्या मसाला डोसाची चव आजही तशीच आहे. पुढे 1990 ला आमच्या स्टेशनरी कटलरी असोसिएशनच्या मित्रांची आणि 'भोजन भाऊ' ग्रुपचा वैशाली कट्टा करण्यात माझा पुढाकार होता. पुढे डॉ.सतिश देसाई सामिल झाले… मग चार टेबलं कमी पडू लागली… 15…16 जणं दर रविवारी सकाळी 9 वाजता…आज तीस वर्ष झालीत पण अव्याहत जमत आहोत !

डॉ. देसाई यांनी आदरणीय जगन्नाथ शेट्टींना 'पुण्यभूषण 'पुरस्कार दिला! दर दिवाळीत आम्ही सर्व स्टाफला दिवाळीत बक्षिस किंवा आठवण म्हणून भेट वस्तू देऊ लागलो. डॉक्टरांच्या विनंतीस मान देऊन हा कार्यक्रम जगन्नाथ शेठच्या हस्ते होई. त्या दिवशी जगन्नाथ शेठची आम्हाला 'ट्रिट' असे. एका वर्षी त्यांनी आम्हांला त्यांच्या फार्महाऊसवर बोलविले. हा दिवस म्हणजे दिलखुलास गप्पांचा !

या पन्नास वर्षात हॉटेल वैशालीत ज्यांचे प्रेम जमले…. त्यांची लग्ने झालीत! मुलांसहित ही जोडपी पुढे वैशालीतच रमत! पुढे मुलांचीही प्रेम येथे फुलली. पहले आप…पहले आप करत लग्नाच्या बेडीत अडकली ! आता नातवंडांची पाळी… पण वेटर तेच! चव तीच!! सांबर तेच !!! वेटर…नव्हे ही तर घरची माणसं… बाळकृष्ण, जयंत, साधू, जया, दयानंद, आनंद, प्रकाश, प्रसाद, मंजूनाथ, गणेश… किती नावं घेणार! आज अनेक वैशालीत जमलेले प्रेम इंग्लंड, अमेरिकेत स्थिरावले आहेत. पण अनेक जोड्या भारतात परत आल्या की मुंबईत उतरून घरी सामान पाठवितात आणि स्वतः वैशालीत येतात!

'डेट'साठी 'वैशाली'चा अड्डा ठरलेला

इडली वडा सांबार… मसाला डोसा हाणणार आणि मग घरी जाणार! 'वैशाली' हे एक पुण्याचे सांस्कृतिक केंद्र आहे. येथे फक्त 'आनंद' साजरा होतो. परीक्षा संपली तरी 'वैशाली.' पास झाला तरी ट्रीट वैशालीत. कॉलेजवयात मित्र-मैत्रीणींचा अड्डा म्हणजे हॉटेल वैशाली. त्यातून जडलेल्या प्रेमाची 'डेट' वैशालीला. लग्न ठरल्याचा आनंद साजरा करायला वैशाली. मुलांचा 'वाढदिवस' केक कापायला वैशाली. बिझनेस डील वैशालीतच. वयस्करांचा हिरवटपणा फुलतो वैशालीत. आज तीन / चार पिढ्यांचा आनंद द्विगुणित करीत आहे जगन्नाथ शेठची वैशाली !

'मेडिटेशन' सेंटरही

हे एक 'मेडिटेशन' सेंटर आहे… वैशालीची स्ट्रॉन्ग कॉफी हा ईलाज आहे. प्रेमपूर्वक सेवा, आदरपूर्वक नम्रता आणि 'मनातली चव' तोंडाला लाभणार ती हॉटेल वैशालीलाच! जगन्नाथशेठ गेल्याची बातमी मनाला क्लेशकारक आहे! त्यांचा दिलदार स्वभाव आणि ग्राहकावरील प्रेम म्हणजेच माणुसकीचा झरा… जो आज आटला. सातत्याच्या सहवासातील समाधानाचे क्षण आज रडू लागलेत ! प्रिय जगन्नाथशेठना आदरपूर्वक श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळो. हीच परमेश्वरास विनंती. वैशाली परिवारास हे दु:ख सहन करण्याची ताकद मिळो..

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT