संतोष शिंदे
पिंपरी : हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्क परिसर अपघातांचा ‘हॉटस्पॉट’ बनत आहे. मागील 11 महिन्यांत या परिसरात झालेल्या विविध अपघातांत तब्बल 36 नागरिकांचा मृत्यू झाला. यामध्ये ‘आयटी’ कंपन्यांत काम करणाऱ्या तरुणांचाही समावेश आहे. वाहनांची अनियंत्रित वर्दळ, खराब आणि अरुंद रस्ते, अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि अवजड वाहनचालकांचा आडमुठेपणा यामुळे आयटी हब परिसर धोकादायक बनत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.
अवजड वाहनांवरील चालकांच्या आडमुठेपणामुळे वाढणारे अपघात रोखण्यासाठी हिंजवडी आणि वाकड वाहतूक शाखेकडून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. शहरात प्रवेशबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 59,196 अवजड वाहनचालकांवर आतापर्यंत गुन्हे नोंदविण्यात आले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 6 कोटी 67 लाख 60 हजार 500 रुपये दंड आकारला आहे. मात्र, तरीही अवजड वाहनांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असल्याने अपघातांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.
हिंजवडी परिसरात सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे आरएमसी प्रकल्पांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. या प्रकल्पांमधून दिवस-रात्र जाणाऱ्या जड वाहनांमुळे रस्त्यांवर कोंडी, धूळ आणि धोकादायक वाहतूक निर्माण होत आहे. बंदीच्या वेळेतही या वाहनांची घुसखोरी सुरू असते. त्यामुळे आता प्रशासनाने आता अधिक कठोर पावले उचलण्याचे ठरवले आहे. दरम्यान, पोलिसांनी आरएमसी प्रकल्प चालक आणि बांधकाम व्यावसायिकांना नोटीस बजावून निर्बंधांचे काटेकोर पालन करण्याचे आदेशही दिले आहेत. यामुळे आरएमसी प्रकल्प मालकांची जबाबदारीही वाढली आहे.
आयटी पार्कमध्ये 150 पेक्षा अधिक नामांकित कंपन्या
दररोज 3 ते 4 लाख कर्मचाऱ्यांची वर्दळ
रस्त्यांची दुरवस्था, खड्डे आणि अपुऱ्या लेन्स
वाकड, रावेत, ताथवडे, पुनावळे परिसरातील वाढते गृहप्रकल्प
आरएमसी प्रकल्पांमुळे अवजड वाहनांची गर्दी
वाहनतळांची कमतरता, रस्त्यावर बेशिस्त पार्किंग
आयटी पार्क परिसरात शासकीय किंवा खाजगी वाहनतळाची व्यवस्था नसल्याने वाहनचालकांना पर्यायी थांबा मिळत नाही. त्यामुळे ही वाहने रस्त्यावरच उभी राहतात. या अनियंत्रित पार्किंगमुळे संपूर्ण मार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर ताण येतो आणि कोंडी निर्माण होते. शिवाय, महामेट्रोच्या कामादरम्यान निर्माण होणारा राडारोडा आणि बांधकाम साहित्य रस्त्यांची उपलब्ध रुंदी कमी करतात. सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी हा राडारोडा तत्काळ हटवणे, तसेच खड्डे तातडीने बुजवणे अत्यावश्यक आहे.राहुल सोनवणे, वरिष्ठ निरीक्षक, हिंजवडी वाहतूक विभाग
सकाळी 8 ते 12 आणि सायंकाळी 4 ते 9 या गर्दीच्या कालावधीत अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी असतानाही काही चालक नियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. बंदीचे वेळापत्रक स्पष्ट असताना या वाहनांची घुसखोरी वाहतूक कोंडी वाढवून अपघातांची शक्यता अधिक तीव करते. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वेळेचे पालन अत्यंत आवश्यक असून, नियम मोडणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाई अधिक कठोर करण्यात येत आहे.मधुकर थोरात, सहायक निरीक्षक, वाकड वाहतूक विभाग