

लोणावळा: लोणावळा शहरामध्ये बेधडकपणे फिरणाऱ्या बिना नंबर प्लेट व काचांना काळ्या फिल्म लावून फिरणाऱ्या 44 वाहनांवर बुधवारी (दि. 26) शहर पोलिसांनी कारवाई करत 38 हजार रुपये दंड केला आहे.
शहरामध्ये निवडणुकांची रंगत वाढत असताना लोणावळा शहराबाहेरील अनेक वाहनांच्या नंबर प्लेट काढून फिरत आहेत. तसेच, काळ्या काचांच्या वाहनांमधून शहराबाहेरील तरुणांची टोळकी शहरामध्ये धुमाकूळ घालत असल्याबाबतची माहिती समोर आल्यानंतर शहर पोलिसांनी आज सकाळपासूनच अशा वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली होती. सायंकाळी चार वाजेपर्यंत अशा 44 वाहनांवर शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.
एकीकडे निवडणुका या तणावमुक्त वातावरणामध्ये पार पडाव्यात, असे निवडणूक आयोग सांगत असताना दुसरीकडे लोणावळा शहरामध्ये मात्र खुलेआम बिना नंबर प्लेट व काळ्या काचा असलेली वाहने फिरत आहेत. पोलिसांनी सुरू केलेली ही कारवाई मतदानाच्या दिवसापर्यंत कायम ठेवावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
टोळक्यांचा शहरात धुमाकूळ
लोणावळा शहरामध्ये निवडणुकीचा फीवर वाढला आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. हा प्रचार होत असताना मतदारांवर दबाव टाकण्याच्या तंत्रदेखील वापरले जात आहे. शहराच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात मनी व मसल पावर वापरात येत आहे. वाहनांची ओळख पटू नये, याकरिता वाहनांच्या नंबर प्लेट काढून वाहने फिरवली जात आहेत.
तसेच, वाहनांच्या काचांना काळ्या फिल्म लावल्या असून, वाहनांमधून कोण ये-जा करत आहे हे कोणाला समजू नये, याकरिता असे वेगवेगळे प्रकार केले जात आहेत. रात्रीच्या अंधारामध्ये अशा वाहनांचा धुमाकूळ सर्वात सुरू आहे. अशा बेनाम वाहने व टोळक्यांमुळे मतदारांवर दबाव येत आहे.