VIshnukaka Hinge 
पुणे

आ. दिलीप मोहिते यांनी जीवनात शिवराळ भाषेत बोलण्याशिवाय काही केले नाही

अमृता चौगुले
  • दूधसंघ अध्यक्ष विष्णूपंत हिंगे यांचा पलटवार

  • राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येच जुंपली

मंचर : पुढारी वृत्तसेवा : खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी त्यांच्या राजकीय जीवनात शिवराळ भाषेत बोलणे, दुसऱ्यांना नावे ठेवणे, वाद घालणे, आरोप करणे या पलीकडे दुसरे काम केलेले दिसत नाही. पुणे जिल्हा दुध उत्पादक संघाची कामगिरी उत्तम असून, त्यासाठी कोणत्या ज्योतिषाकडे जाण्याची गरज नाही, असा टोला जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काॅग्रेसचे आंबेगाव तालुका अध्यक्ष अ‍ॅड. विष्णुकाका हिंगे-पाटील यांनी लगावला. हिंगे यांच्या पलटवारामुळे राष्ट्रवादीच्याच दोन नेत्यांमध्ये जुंपल्याचे चित्र आहे.

खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी पुणे जिल्हा सहकारी दुध संघावर,अध्यक्ष विष्णु हिंगे आणि संचालक मंडळावरभ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या पार्श्वभुमीवर एकलहरे (ता. आंबेगाव) येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत हिंगे बोलत होते. ते म्हणाले, 'आमदार दिलीप मोहिते यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आणि पुर्णपणे चुकीचे आहेत.

चांभारेंना मदत न केल्यानेच राग

२०१४-१५ चे संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये आ. मोहीते यांचे समर्थक अरुण चांभारे यांचा अर्ज अवैध ठरल्याने चंद्रशेखर शेटे संघावर संचालक म्हणून निवडुन आले. चंद्रशेखर शेटे हे आमदार मोहिते पाटील यांचे समर्थक नाहीत. अरुण चांभारे यांनी संघाचे संचालक असताना त्यांच्या शिफारशीवरुन त्यांच्या कुटुंबातील सदस्याला कात्रज दुध व दुग्धजन्य पदार्थाची वितरण एजन्सी देण्यात आली होती. त्यांनी संघाच्या विक्री बील रकमेचे दिलेले चेक न वटता परत आल्याने त्याची एकुण रक्कम ४२ लाख रुपये येणेबाकी आहे. सदरची रक्कम वसुलीकामी न्यायालयात खटला चालु आहे. त्याचा राग आमदार मोहिते यांच्या मनात आहे, असेहीते म्हणाले.

अरुण चांभारे यांना सहकार्य करावे म्हणून आमदार मोहिते यांनी अनेकवेळा मला फोन केला आहे. परंतु सदर विषय न्यायप्रविष्ट आहे, असे सांगून अध्यक्ष हिंगे म्हणाले, पक्ष निष्ठेबाबत आमदार मोहिते यांनी मला शिकवू नये. पक्ष संघटनेत युवक अध्यक्ष म्हणुन ११ वर्ष तसेच पक्षाचा तालुकाध्यक्ष म्हणुन १५ वर्ष काम केले आहे. आजदेखील राष्ट्रवादी काँगेस पक्षाचा तालुकाध्यक्ष आहे. दुसऱ्या पक्षातून येऊन मी पदे मिळवलेली नाहीत. आंबेगाव तालुक्यातील जनतेने मला पाचवेळा संचालक म्हणून बिनविरोध संघावर निवडून दिले आहे.

दूध संघाची प्रगतीच

जिल्हा दूध संघामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार दिलीप मोहिते यांनी केला. याबाबत बोलताना हिंगे म्हणाले गेल्या ५-६ वर्षात मी जिल्हा दूध संघाचा अध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक मंडळाच्या सहकार्याने केलेल्या कामाचा आढावा पुढीलप्रमाणे आहे. – ऑडिट वर्ग सतत अ, – संघाचा नफा १४ कोटी ८९ लक्ष रुपये, – संघाचे सभासद भागधारकांना लाभांश ४ कोटी ८० लक्ष, – संघाचे बँकेतील ठेवी रु. ५८.३९ कोटी. (पाच वर्षातील वाढ रु.३३.८८ कोटी), – शेतकऱ्यांना दूध दर फरक (बोनस) रु. ३८.४६ कोटी, संघाचे गंगाजळीत १००टक्के गुंतवणूक रु. ७.२९ कोटी, – संघाने नविन प्रकल्पासाठी केलेली गुंतवणूक रु. २०.२४ कोटी, – संघाने भरलेला आयकर रु.२.५६ कोटी.

या सर्व बाबींचा विचार करता ५-६ वर्षात संघाची आर्थिक वाढ रु. ११०.३३ कोटी झालेली दिसत आहे. गेल्या ५-६ वर्षात संघाची आर्थिक वाढ ११०.३३ कोटी रुपये झाली आहे. यामध्ये वाढ करुन कात्रज ब्रॅण्ड संपुर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय केला आहे. पाच वर्षात कामगारांच्या पगारात प्रतिमाह सुमारे आठ ते दहा हजार रुपये वाढ दिली आहे. आमदार दिलीप मोहिते सोडून इतर सर्व शेतकरी, सभासद व संघाचे कामगार संचालक मंडळाच्या कारभारावर समाधानी आहेत. आमदार मोहिते यांनी बाष्कळ बडबड बंद करावी. अन्यथा त्यांच्याविरोधात मला कठोर भुमिका घ्यावी लागेल. तसेच पक्षश्रेष्ठींकडेही त्यांच्याबाबत मी तक्रार करणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT