पुणे

सायबर चोरट्यांकडून उच्च शिक्षित टार्गेट; टास्कच्या नावाखाली तिघांना 13 लाखांचा गंडा

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सायबर चोरट्यांकडून उच्च शिक्षितांना टार्गेट करण्यात येत असून, मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करण्यात येत आहे. गुरुवारी शहरातील चंदननगर, हडपसर आणि मुंढवा पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले असून, सायबर चोरट्यांनी 13 लाख 13 हजार 195 रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. टास्कच्या आमिषाने खराडीतील एकाची 7 लाख 45 हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी जसदेव कुलजित सिंग (वय 43, रा. तुकाईनगर, खराडी) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली. त्यानुसार टेलिग्राम युझर आणि विविध बँकधारकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 1 डिसेंबर 2024 ते 28 मार्च या दरम्यानच्या काळात घडली आहे.

सायबर चोरट्याने फिर्यादी जसदेव सिंग यांना फोन करून टास्क जॉब आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल, असे सांगून 7 लाख 45 हजार पाठवायला भाग पाडून फसवणूक केल्याचे फिर्यादेत नमूद केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास चंदननगर पोलिस करत आहेत. तर दुसर्‍या घटनेत मगरपट्टा भागात राहणार्‍या एकाची टास्कच्या आमिषाने 2 लाख 57 हजार 195 रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी अरविंद राजामणी अय्यर (वय 43, रा. मगरपट्टा सिटी हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 28 जुलै 2023 ते 28 मार्च 2024 च्या दरम्यान घडली.

टास्कपूर्ण केल्यास चांगला नफा देण्याचे आमिष फिर्यादी अय्यर यांना दाखवण्यात आले. यानंतर फिर्यादी अय्यर यांना पहिल्या काही टास्कसाठी 3 हजार 700 रुपये पाठवण्यात आले. यानंतर फिर्यादी यांना वेगवेगळ्या कारणासाठी 2 लाख 57 हजार 195 रुपये पाठवायला लावून फसवणूक करण्यात आली आहे. वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून टास्कच्या जॉब देऊन केशवनगर, मुंढवामधील एकाची 3 लाख 11 हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी रुचिका रावसाहेब गावडे- पिंगळे (वय 30, रा. केशवनगर, मुंढवा) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 12 ते 24 जानेवारी 2024 दरम्यान घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना सायबर चोरट्याने ऑनलाइन टास्कच्या माध्यमातून चांगले इन्कम करता येईल, असा मेसेज पाठवून संपर्क केला. यानंतर फिर्यादी यांनी टास्क पूर्ण केल्यानंतर अजून जास्त पैसे मिळतील, असे सांगून वेगवेगळ्या बँक खात्यात 3 लाख 11 हजार पाठवायला सांगून फसवणूक करण्यात आली आहे.

सायबर चोरट्यांकडून महिलेची अडीच लाखांची लूट

वीजपुरवठा खंडित करण्याच्या बतावणीने फसवणूक करण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढीस लागले आहेत. सायबर चोरट्यांनी एका महिलेकडे बतावणी करून बँक खात्यातून अडीच लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका महिलेने वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला कर्वेनगर भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइलवर संपर्क साधला. थकीत वीज देयक न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, अशी बतावणी चोरट्यांनी केली. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला एक अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. महिलेने अ‍ॅप डाऊनलोड केले. तिच्या बँक खात्याची सर्व माहिती चोरट्यांनी घेतली. महिलेच्या बँक खात्यातून दोन लाख 54 हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जगताप पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT