Lok Sabha Election 2024 : ठाकरेंची साथ सोडणार का? अंबादास दानवेंनी स्पष्ट सांगितलं | पुढारी

Lok Sabha Election 2024 : ठाकरेंची साथ सोडणार का? अंबादास दानवेंनी स्पष्ट सांगितलं

पुढारी ऑनलाईन डेस्क : मी बाळासाहेबांच्या विचारांवर लढणारा शिवसैनिक आहे. मला कोणत्याही पक्षाची ऑफर नाही. मी शिवसेना आणि ठाकरेंची साथ सोडणार नाही. भाजप प्रवेशाच्या बातम्या खोट्या आहेत, अशी भूमिका स्पष्ट करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आज (दि.३०) भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी ठाकरे गटाचे अंबादास दानवे (Ambadas Danve) आणि चंद्रकांत खैरे इच्छुक होते. मात्र पक्षाने खैरे यांना तिकीट दिले. त्यानंतर दानवे नाराज असल्याची चर्चा होती. यादरम्यान, दानवे यांच्या ‘याचना नहीं अब रण होगा…’ या फेसबूक पोस्टनंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आज त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. पक्षाकडे तिकीट मागणे गुन्हा नाही. चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जाहीर होताच नाराजी मिटली. माझं नाव स्टार प्रचारकांच्या यादीत आहे. शिवसेनेच्या उमेदवारांचा मी महाराष्ट्रभर प्रचार करणार आहे. मी बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने लढणारा कार्यकर्ता आहे. गटप्रमुख ते विरोधी पक्षनेते पदाचा माझा गेल्या ३० वर्षांचा प्रवास आहे. माझ्याविषयी अपप्रचार करणारे दलाल यात मोठया प्रमाणात घुसले आहेत. आधार नसलेल्या व कोणत्याही धारा नसलेल्या बातम्या पसरविल्या जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

संभाजीनगर ८ दिवसांत ढवळून काढता येतो. १०० गावांचा दौरा आतापर्यंत केला आहे. जिल्ह्यात संघटनात्मक ढाचा आहे. निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वत्र दौरा करणार असून खैरे हे आमचे नेते आहेत. त्यांच्या प्रचाराचे काम करणार आहे. युतीकडून मला कोणतीही ऑफर नाही. शिवसेनेत आजही आम्ही शिस्त पाळणारे कार्यकर्ते आहोत. संभाजी नगरात संघटनेच पूर्ण ताकदीने काम करणार आहे. संभाजीनगर मधील जनतेचे शिवसेनेवर, बाळासाहेब व उद्धव ठाकरे यांच्यावर प्रेम आहे. मराठवाड्यात युतीची एकही जागा येणार नाही, हा मोठा भुकंप होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

ठाकरेंच्या सेनेकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ठाकरे गटाने ‘सामना’च्या माध्यमातून ही यादी जाहीर केली आहे.  चांद्यापासून बांद्यापर्यंत अख्ख्या महाराष्ट्रात वाघाची डरकाळी आता घुमणार असल्याचे ठाकरेंच्या शिवसेनेने म्हटले आहे. या स्टार प्रचारकांमध्ये सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, अनंत गिते, चंद्रकांत खैरे, खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, आमदार अनिल परब, खासदार राजन विचारे, आमदार सुनील प्रभू यांचा समावेश आहे.

याबरोबरच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, पक्षाचे सचिव आदेश बांदेकर, युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई, उपनेते रवींद्र मिर्लेकर, विशाखा राऊत, नितीन बानुगडे-पाटील, लक्ष्मण वडले, प्रियांका चतुर्वेदी, सचिन अहिर, मनोज जामसुतकर, सुषमा अंधारे, संजय जाधव, किशोरी पेडणेकर, उपनेत्या ज्योती ठाकरे, संजना घाडी, शीतल शेठ-देवरुखकर, जान्हवी सावंत, शरद कोळी, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार सुनील शिंदे, विलास पोतनीस, वैभव नाईक, नितीन देशमुख, आनंद दुबे, किरण माने, सुभाष वानखेडे आणि प्रियंका जोशी हे देखील प्रचारकांच्या यादीत आहेत. (Lok Sabha Election 2024 Maharashtra)

हेही वाचा : 

Back to top button