पुणे: वाहनांना हायसिक्युरिटी नंबर प्लेट (एचएसआरपी) बसवण्याचा उद्या (दि. 30) शेवटचा दिवस आहे. त्यातच परिवहन विभागाकडून त्याच्या मुदतवाढीबाबत कोणतेही पत्र आलेले नाही.
त्यामुळे सोमवारपासून (दि. 01 डिसेंबर 2025) एचएसआरपी नंबर प्लेट बसवायला मुदतवाढ मिळणार की सोमवारपासून कारवाई होणार, याबाबत वाहनचालकांना प्रश्न पडलेला आहे.
राज्यातील सन 2019 पूर्वीच्या वाहनांना 'एचएसआरपी' (हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) बसविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्यभरातील विविध शहरांमध्ये 2019 पूर्वीच्या वाहनांना या नंबर प्लेट बसविण्याचे काम सुरू आहे.
मात्र, याला वाहनधारकांकडून थंड प्रतिसाद आहे. त्यामुळे यापूर्वीही वाहनचालकांना अनेकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या पुण्यासह राज्यात लाखोंच्या घरात वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे काम बाकी आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा या नंबर प्लेट बसविण्यासाठी मुदतवाढ मिळेल, अशी अपेक्षा वाहनचालकांमध्ये आहे.