उरुळी कांचन: आठ वर्षांनंतर पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत हवेली तालुक्यातील कार्यकर्त्यांचे उमेदवारांनी चांगलेच चोचले पुरविले. उमेदवारांनी आपली उमेदवारीची नौका काठावर आणण्यासाठी कार्यकर्त्यांवर चांगलीच माया रिचविल्याने तालुक्यातील कार्यकर्त्यांची मनोकामना पूर्ण झाली. कार्यकर्त्यांनी देखील उमेदवारांकडून हौस भागवून घेतली आहे. मात्र, आता निवडणूक संपली आणि तोंडाला लागलेली रश्यांची चव, पिण्यासाठी रम अन् वाटलेल्या नोटा संपल्याने कार्यकर्त्यांवर ‘अन्नदाता’ शोधण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रलोभनांनी गाजल्याने तालुक्यात निवडणुकीनंतर मात्र कार्यकर्त्यांची दैना सुरू झाली आहे. मतदानापर्यंत सकाळी नाष्टा, दुपारी जेवण, रात्री दारूसोबत रस्सा मिळत असल्याचे चित्र गेल्या 15 दिवसांत तालुक्यात दिसत होते. त्यामुळे निवडणुकीनंतर आता विशेष खुराक व ओठांवर आलेली चव कोण पुरविणार म्हणून मतदार चिंतेत पडले आहेत.
मतदारांनाही सुरुवातीला देवदर्शन व पर्यटनवारी केल्यानंतर मतदाराजाने उरलीसुरली पैशांची हौस भागवून घेतल्याने गेला महिनाभर निवडणुकींचा हौस हंगामा संपला. हवेली तालुक्यात कधी नव्हे इतक्या कोट्यवधींच्या खर्चाने निवडणुका गाजल्या आहेत. मतदारांना काय हवे आहे ते सर्वच उमेदवारांनी पुरविले. उमेदवारांनी बँकांत जमीन गहाण ठेवून, काहींनी विकून, काहींनी टक्केवारीने सावकारांकडून पैसे काढून मतदारांची व्यवस्था लावण्याचा प्रयत्न केला होता. या सर्व उमेदवारांना मतदारांनीही वेगवेगळ्या पद्धतीने साद, प्रतिसाद देऊन आपला विजय अटळ असल्याचा आभास निर्माण करून सर्वांची मर्जी अतिशय खुबीने चलाख मतदारराजाने राखल्याने आता मात्र हे सर्व भुकेने व्याकूळ झाले आहेत.
उमेदवार खर्चाने बेजार
’धरलं तर चावतंय अन् सोडलं की पळतंय...’ अशी अवस्था या निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या उमेदवारांची झाली होती. सुरुवातीला जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ही निश्चित कालावधीत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, महापालिकेनंतर ही निवडणूक झाल्याने तयारीत असलेल्या सर्व उमेदवारांचा खर्च अधिक पटीने झाला. उमेदवारांनी पहिले यात्रा, सहली आणि नंतर सांस्कृतिक कार्यक्रम व नोटा, असा कार्यक्रम राबविल्याने विजयी व पराभूत उमेदवार पक्के बेजार झाल्याची चर्चा आहे.
नवसाचा फॉर्म्युला सुरू
आता निवडणूक संपल्यानंतर विजयी उमेदवारांना गाठण्यास सुरुवात केली आहे. हे चलाख कार्यकर्ते आता उमेदवारांकडून नवस फेडण्यासाठी फर्माईश करीत आहेत. त्यामुळे आधीच खर्चाने मोकळ्या विजयी उमेदवारांना नवसाचा फेरा पूर्ण करावा लागत असल्याने उमेदवार चांगले धास्तावले आहेत.