उरुळी कांचन: सर्वसाधारण खुल्या गटासाठी आरक्षित असलेल्या हवेली पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी राष्ट्रवादी काँग््रेास पक्षात प्रचंड स्पर्धा लागली असून, मोठे ‘लॉबिंग’ सुरू आहे. सभापतीची माळ गळ्यात पडावी म्हणून थेट पक्षाच्या वरिष्ठ फळीकडे ‘लॉबिंग’ करण्यापर्यंत ही स्पर्धा गेली आहे. सभापतिपदासाठी स्थानिक आमदारांचा शब्द अंतिम ठरणार की सभापतीचे नाव थेट प्रदेशपातळीवरून अंतिम होणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
सभापतिपदासाठी सोमवारी (दि. 9) निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. एकूण बारा सदस्यांच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग््रेासकडे 6 सदस्य आहेत. एका अपक्षाने त्यांना पाठिंबा दिल्याने सभापतिपद हे राष्ट्रवादीकडे जाणार, हे निश्चित झाले आहे. त्यामुळे सभापतिपदासाठी राष्ट्रवादीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीकडून थेऊर गणातून निवडून आलेले युवराज काकडे, कोरेगावमूळ : मनोज चौधरी तर खानापूर : युवराज वांजळे यांची नावे चर्चेत आहेत. या इच्छुकांनी थेट पक्षाच्या प्रदेशफळीपासून लॉबिंग सुरू केल्याने सभापतिपदासाठी मोठी चुरस पक्षात पाहायला मिळत आहे.
हवेली तालुक्यातील सर्वांत मोठा भाग म्हणून पूर्व हवेली तालुक्यात सभापतीसाठी पक्षाला प्राधान्य द्यावे लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत या ठिकाणी पक्षाला 5 पैकी 4 जिल्हा परिषद गटांत घवघवीत यश मिळाले आहे. सभापतीसाठी मिळेल ती किंमत मोजून हे पद पदरात पाडून घेण्यासाठी ही स्पर्धा वाढली असून, पक्षाकडून शिस्तबद्ध पध्दतीने निवड होणार की पक्षश्रेष्ठी तालुक्यातील मागच्या कटू आठवणी लक्षात घेऊन ‘ताक फुंकून पिणार’ याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती निवडणिकीत बारामती तालुक्यात राष्ट्रवादी काँग््रेासने एकहाती वर्चस्व निर्माण केले. पंचायत समितीच्या 12 जागांपैकी राष्ट्रवादी काँग््रेासचे 10 सदस्य निवडून आले. उर्वरित दोन जागा भारतीय जनता पक्षाच्या खात्यात गेल्या. दरम्यान, सोमवारी (दि. 9) पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतिपदाची निवड होणार आहे. त्यामुळे सभापतिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
यंदा प्रदीर्घ कालावधीनंतर पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण गटासाठी खुले झाले आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. सभापतिपदासाठी प्रबळ दावेदार पणदरे गणातील किरण तावरे, निंबुत गणातील दिग्विजय जगताप व वडगाव गणातील जितेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा आहे. कोणाच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. पश्चिम भागातून दिग्विजय जगताप यांचे नाव आघाडीवर आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तोंडावर असल्याने त्यांच्या नावाची चर्चा अधिक रंगली आहे.
नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने पुणे जिल्ह्यात अभूतपूर्व यश मिळविले. बारामती तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व सहा आणि पंचायत समितीच्या दहा जागा विक्रमी मताधिक्याने जिंकत पक्षाने बारामती हा आपला अभेद्य गड असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. दरम्यान, पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती निवडीचे सर्वाधिकार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे असून, त्या कोणाला संधी देतात, याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.