पुणे

कात्रज : लोंबकळणार्‍या तारांमुळे जीव टांगणीला!

अमृता चौगुले

कात्रज(पुणे); पुढारी वृत्तसेवा : कात्रज-कोंढवा रस्ता परिसरातील विद्युत खांबांवर लोंबकळणार्‍या तारा सर्रासपणे आढळत असून त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. ते खांब व तारा हटवून विद्युतवाहिन्या भूमिगत करण्याकडे मनपा व महावितरण विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कात्रज-कोंढवा रस्ता, संतोषनगर, शिवशंभोनगर, स्वामीसमर्थनगर, महादेवनगर, गोकुळनगर, आंबेडकरनगर आदींसह विविध भागांत आजही खांबावर विद्युत तारा लोंबकळत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. झाडाच्या फांद्याचा अडथळा व सध्या पावसाचे दिवस असल्याने वारंवार शॉट सर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे.

एकाच खांबावरून अनेक ग्राहकांना पुरवठा केला जात असल्याने वीज दाब कमी होत असून, विद्युत उपकरणे चालत नाहीत. तसेच बिघाड होत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण असून, स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या वाहिन्या एकमेकांना चिकटल्याने अनेक वेळा आग लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. महापालिका आणि महावितरण प्रशासनाकडे तोंडी आणि लेखी तक्रार करूनही कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

विद्युत खांबही अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळ ठरत आहेत. रात्री-अपरात्री खांबाचा अंदाज न आल्याने छोटे-मोठे अपघाताच्या घटना घडत असतात. महापालिका आणि वीजवितरण कंपनीने तातडीने विद्युत खांब हटवून वीजवाहिनी भूमिगत करावी, अशी मागणी याठिकाणी करण्यात येत आहे. याबाबत महापालिका विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT