पुणे : पाच वर्षांत पालिकेचे 22 जण एसीबीच्या जाळ्यात | पुढारी

पुणे : पाच वर्षांत पालिकेचे 22 जण एसीबीच्या जाळ्यात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही वर्षांपासून महापालिकेत लाचखोरीचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे 2018 पासून गेली पाच वर्षांत महापालिकेतील 22 अधिकारी व कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात अडकले आहेत.
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिपत्याखाली पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर असे पाच जिल्हे येतात.

त्यापैकी पुणे जिल्ह्यात दर वर्षी लाचखोरींच्या सर्वाधिक कारवाया केल्या जातात. पुणे जिल्ह्यात दोन महापालिका व राज्य सरकारची अनेक महत्त्वाची कार्यालये आहेत. पोलिसांचे अनेक विभाग आहेत. ”एसीबी”कडून जिल्ह्यात लाचखोरांवरील कारवाईत महसूल व पोलिस विभाग कायम आघाडीवर असल्याचे दिसून येते. या दोन विभागांत लाच मागताना अटक केलेल्यांचे प्रमाण सर्वाधिक असते. त्याखालोखाल आता महापालिकेचा नंबर लागू लागला आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातून ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका कर्मचार्‍याला मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. चतु:शृंगी पाणीपुरवठा विभागात ही कारवाई करण्यात आली. काही दिवसांपूर्वीही आरोग्य विभागातील एक कर्मचारी लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकला. त्यामुळे पालिकेत खाबुगिरी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

2018 मध्ये महापालिकेतील 5 कर्मचार्‍यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यानंतर कोरोना काळ असल्याने 2019/20 मध्ये फक्त 3 कर्मचार्‍यांना, त्यानंतर 2021 मध्ये 6 आणि 2022 मध्ये 6 लाचखोर पालिका कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकले. आता चालू वर्षात 3 कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा

पुणे : सशस्त्र दरोडा टाकणारी टोळी जेरबंद; 18 गुन्ह्यांचा छडा

पुण्यात चोरटे झाले उदंड; सहा घरफोड्यांत 20 लाखांचा ऐवज लंपास

काँग्रेस भाजपविरोधात तीव्र लढा उभारणार : नाना पटोले

Back to top button